ठाणे : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील मारहाणीच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करतानाच, या घटनांमागे पालिका प्रशासनाची निष्क्रियता, अपुऱ्या सुविधा, वाढता भ्रष्टाचार आणि त्यात सहभागी असलेले लोकप्रतिनिधी हेच मूळ कारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “जोपर्यंत लोकांमध्ये जागृती होत नाही, तोपर्यंत खऱ्या विकासाचा ”रवी” उगवणार नाही, ” असा टोला लगावला आहे.
राजू पाटील यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयासह महापालिकेच्या इतर दवाखान्यांमध्येही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. मात्र, यामागील मूळ कारणांकडे कोणीही लक्ष देत नाही. कंत्राटी पद्धतीवर डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांची सेवा घेणे एवढ्यावरच पालिका प्रशासन थांबते. त्यानंतर या व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचा आरोप त्यांनी केला.
रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाची कमतरता आणि वाढत्या ताणामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सातत्याने कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय पालिका प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि त्यात सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधींमुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
रमेश म्हात्रे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना राजू पाटील यांनी, “रमेश म्हात्रे शंभर टक्के चुकले आहेत. त्यांनी गुन्हाच केला असून त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे, ” असे स्पष्टपणे म्हटले. मात्र, प्रत्येक वेळी अशा घटना घडल्यानंतर केवळ हिंसेचा निषेध केला जातो, पण त्यामागील भ्रष्ट व्यवस्था, प्रशासनाचे अपयश आणि राजकीय हस्तक्षेप यावर कोणीही बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“या शहराचे राजकारण सध्या केवळ भावनेवर चालले आहे. त्यामुळे आपल्या नशिबालाच आपले कर्तृत्व समजणारे काही दादा स्वतःच्या तोऱ्यात वावरत आहेत. जोपर्यंत लोकांना या व्यवस्थेची जाणीव होत नाही, तोपर्यंत खऱ्या विकासाचा ”रवी” उगवणार नाही, ” असा टोला त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना लगावला.
याचबरोबर ”पाच आंधळे आणि हत्ती” या गोष्टीचा दाखला देत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. “सामान्य जनता, माध्यमे आणि राजकारणी हे केवळ हिंसेच्या घटनेवर बोलतात; मात्र त्यामागे उभा असलेला प्रशासकीय आणि राजकीय भ्रष्टाचाराचा महाकाय हत्ती कोणालाही दिसत नाही किंवा पाहायचा नसतो. हेच आपल्या लोकशाहीचे आणि समाजव्यवस्थेचे सर्वात मोठे दुर्दैव आहे, ” असेही राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
