कल्याण : ‘अडीच वर्षांनंतर आपण पुन्हा आमदार होणार,’ असा ठाम विश्वास मनसे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना एसआयआर मोहीम आणि मतदार यादीबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची माहिती आपल्याला होती; मात्र हा प्रकार पकडण्यात आपण अयशस्वी ठरलो, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे आता सुरू असलेल्या एसआयआरमध्ये कार्यकर्त्यांनी अधिक सावध राहून मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची पडताळणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डोंबिवली येथे रविवारी भाजपमध्ये गेलेल्या मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला. या घरवापसीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत भाष्य केले. ‘अडीच वर्षांनंतर आपण पुन्हा आमदार होणार,’ या त्यांच्या वक्तव्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी राजू पाटील यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि राजू पाटील यांच्यात मोठे राजकीय वाद देखील झाले होते.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला महापौर पदाच्या उमेदवारासाठी पाठिंबा देत महापालिकेत युती केली. असे असतानाच आता राजू पाटील यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत, मतदान प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. २०२४ ला निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची माहिती आपल्याला होती; मात्र त्यावेळी हा प्रकार प्रत्यक्षात पकडण्यात आपण अपयशी ठरलो, असा दावा त्यांनी केला. आता पुन्हा निवडणूक होण्याच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या पातळीवर कोणतीही हलगर्जी होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

‘मतदारांच्या नावांची योग्य पडताळणी करा’

सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेकडे त्यामुळे विशेष गांभीर्याने पाहण्याचे आवाहन पाटील यांनी केले. मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासावी, पात्र मतदारांची नावे यादीत आहेत की नाहीत याची खात्री करावी, तसेच मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदींबाबत योग्य ती पडताळणी करावी, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, भाजपमध्ये गेलेल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पुन्हा मनसेत झालेली घरवापसी ही देखील स्थानिक राजकारणातील महत्त्वाची घडामोड आहे.