सणसमारंभांपासून सहलीपर्यंत आणि उत्सवांपासून उत्साहापर्यंत प्रत्येक क्षणाचा ‘सेल्फी’ स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात टिपण्याकडे अलीकडे कल वाढला आहे. ‘सेल्फी’च्या पसंतीची ही छाप आता राख्यांवरही दिसू लागली आहे. बहीणभावाचे छायाचित्र असलेल्या राख्या आता ऑनलाइन बाजारात विक्रीस आल्या असून त्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

राखीपौर्णिमेच्या राख्या सध्या ऑनलाइन बाजारात उपलब्ध होत असल्याने बाजारहाट करून राखी खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या एका क्लिकवर राखी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विशेष म्हणजे भारतीय बाजारपेठा आणि सण-उत्सव हे समीकरण हेरून आता ऑनलाइन संकेतस्थळांनीही उत्सवांसाठी लागण्याऱ्या वस्तूंची विक्री सुरू केली आहे.  राखीपौर्णिमेला बहिणीकडून भावाने राखी बांधून घेण्याच्या परंपरेलाही काहीसा नवा रंग देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यांतील गोड आठवणी किंवा आपल्या लाडक्या भावाचे छायाचित्र असलेल्या राख्या बनवून घेण्याला ग्राहक पंसती देत आहे. संकेतस्थळांबरोबरच फोटो आर्ट करणाऱ्या दुकानांमध्ये अशा राख्या तयार करून दिल्या जात आहेत. या राख्यांचे वैशिष्टय़ म्हणजे लाकडी पृष्ठभागावर असलेल्या छायाचित्राचे ‘की- चेन’ म्हणून पुनर्वापर करता येतो. २०० रुपयांपासून अगदी १५०० रुपयांपर्यंत या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. फोटो राखीसाठी संबधित कंपनीला आपला फोटो ई-मेल द्वारे पाठवावा लागतो. त्यानंतर आपल्याला पसंतीच्या राखीची निवड करून नाव, पत्ता दिला की झाले. ती छायाचित्र असलेली ही राखी आपल्याला घरपोच मिळते.

तरुण मंडळी नेहमीच काहीतरी वेगळे आणि नवीन करण्यासाठी उत्सुक असतात. नवी स्टाइल, नवे ढंग त्याचबरोबर नवे शब्दही ते स्वत: करतात. यो, स्व्ॉग, ब्रो असे काही शब्द महाविद्यालयीन तरुणांकडून आर्वजून ऐकायला मिळतात. गेल्या वर्षांपासून अशा शब्दांच्या राख्यांनी बाजार सजलेला पाहायला मिळत आहे. मेटॅलिक (धातूच्या) राख्यांमध्ये असे विविध शब्द वापरून आकर्षक राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या राख्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या ब्रेसलेटसारख्याही वापरता येऊ शकतात. तसेच बरेच जण की-चेन किंवा पेन्डंट म्हणूनही वापर करतात. चष्मा, मिशा, कॅमेरा, व्हिडीयो गेम यांसारख्या भाऊरायाला संबोधित करणारे चिन्ह वापरून त्यावर ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’, ‘प्यारा भाई’, ‘स्वॅगवाला भाई’ असे शब्द कोरलेल्या अनेक प्रकारच्या राख्या ऑनलाइन संकेतस्थळांसोबत बाजारातही उपलब्ध आहेत.

ऑनलाइन खरेदी

ऑनलाइन खरेदीमुळे सर्वच कंपन्यांनी ई-राखी ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तूंचे नानाविध प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. साध्या राखी ते अगदी लाखो रुपयांच्या राख्यांचा समावेश आहे. कोणत्याही संकेतस्थळावर जाऊन ई-राखी शोधल्यास या राख्यांचे आणि भेटवस्तूंचे अनेक पर्याय उपलब्ध होतात.