ठाणे : पारंपरिक पेढा, बर्फी व लाडूंसोबत ग्राहकांना वेगळ्या चवींचा अनुभव मिळावा, यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. यंदा नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाला ठाण्यातील मिठाईवाल्यांच्या मुदपाकखान्यात नव्या चवींचे रसायन तयार केले जात आहे. नारळी पौर्णिमेचा संदर्भ जपत खोबरे पाक, तर रक्षाबंधनासाठी मँगो टॅंगो, क्रॅनबेरी क्रंच व लोटस बिस्कॉफ बर्फी तयार करण्यात आले आहेत. सणांच्या दिवसांत मिठाईची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या मिठाई बाजारात आणल्या जातात. विशेषतः रक्षाबंधनाला मिठाईची देवाणघेवाण केली जाते.

खोबरे पाक २०० रुपये पाव किलो दराने विकला जात आहे. तर रक्षाबंधनासाठी मँगो टॅंगो व क्रॅनबेरी क्रंच तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही मिठाईंची किंमत १,७८० रुपये पाव किलो आहे. याशिवाय लोटस बिस्कॉफ बर्फीही यंदा प्रथमच मिठाईचा दरवळही भरून राहिला आहे. ही मिठाई ३०० रुपये पाव किलो दराने विकली जात आहे. दरम्यान, मावा ४८० रुपये किलो, मलाई ९०० रुपये किलो, ड्रायफ्रूट्स मिठाई १,२०० रुपये किलो, तर काजू-बर्फीसह काजूवर आधारित मिठाई १,५८० रुपये किलो दराने विकली जात आहे.

काजू, केसर त्रिवेणी

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘टिप टॉप मिठाईवाला’तर्फे काजू केसर त्रिवेणी ही विशेष मिठाई उपलब्ध करण्यात आली आहे. यात गोव्याच्या काजूमध्ये काश्मिरी केसराचा सुगंध उतरवून, त्यावर अंजीरचा थर देऊन इराणी पिस्ता व बदामाच्या कापांची सजावट करण्यात आली आहे. केशरी रंगाचा आकर्षक थर व विविध चवींच्या या मिसळणीमुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ही मिठाई विशेष आकर्षण ठरत आहे. ही मिठाई ३९५ रुपये पाव किलोने विकली जात आहे.

दरवर्षी सणानिमित्त काही ना काही वेगळी मिठाई तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे यंदाही नवीन मिठाई तयार करण्यात आली आहे. ग्राहकांकडून या मिठाईंना चांगली पसंती मिळत आहे. नवीन मिठाई असल्याने ग्राहक आधी चव घेऊन पाहतात. त्यानंतर चव आवडल्याने खरेदी केली जात आहे. नवीन मिठाईच्या ऑर्डरदेखील मिळाल्या आहेत. -देवाशीष दास, टीप टॉप मिठाई