ठाणे : रक्षाबंधनासाठी भावांच्या घरी निघालेल्या बहिणींचे शुक्रवारी उपनगरी रेल्वे व रस्ते प्रवासात प्रचंड हाल झाले. रेल्वे स्थानकांत झालेली गर्दी, स्थानकाबाहेर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेल्या रिक्षा, घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी यामुळे बहिणींना वेळेत भावाच्या घरी पोहचता आले नाही.

रक्षाबंधनासाठी ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी तसेच पालघरसह विविध भागांतून महिला आपल्या माहेरी अथवा भावांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. बहुतांश कंपनी, कार्यालयांना सुट्टी असल्याने स्थानकांत गर्दी कमी अशी आशा महिलांना होती. परंतु शुक्रवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकांवर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली. ठाणे रेल्वे स्थानकासह दिवा, डोंबिवली, कल्याण व बदलापूर स्थानकावरही प्रवाशांची वर्दळ वाढली होती. गर्दीमुळे लोकलमध्ये चढताना आणि उतरताना महिलांना मोठी कसरत करावी लागली.

रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतरही स्थानकाबाहेर रिक्षांसाठी मोठ्या रांगा लागल्याने अनेक महिलांना बराच वेळ रिक्षाची प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी प्रवाशांच्या तुलनेत रिक्षांची संख्या अपुरी पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे महिलांना मन:स्ताप सहन करावा लागला.

ठाण्यातील घोडबंदर घाटात सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे बोरिवली, वसई, विरारहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना व वाहन चालकांनाही वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागला. घोडबंदर घाट मार्गावर फाऊंटन ते गायमुख पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचेही वाहतूक कोंडीत हाल झाले.

रक्षा बंधनासाठी गोराई येथून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होती. परंतु फाऊंटन येथील वाहतूक कोंडीमुळे १० मिनिटांच्या अंतरासाठी ३० ते ३५ मिनीटे लागली. – अमृता शेट्ये, गोराई, रहिवासी.