ठाणे -शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन एक महिना उलटल्यानंतर देखील न्याय मिळत नसल्याने रविवारी राम पूर्णेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी झाली. ठाण्यात राम पूर्णेकर यांनी ही दुसऱ्यांदा भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची मानपाडा भागात पाच जणांनी कार्यालयात शिरून निर्घृण हत्या केली होती. या हत्येतील मुख्य सूत्रधार शिंदे गटच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहेत असा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे. त्यांच्या अटकेची मागणी दररोज पूर्णेकर कुटुंब करत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील ठाण्यात आले होते. त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, या आरोपांनतर प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे; मात्र घटनेचे राजकारण होणे त्याहून जास्त दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केले. शिवसेना पुर्णेकर कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश आपण घटना घडल्यावर तत्काळ ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.रविवारी महायुती कडून लोकतंत्र पदयात्रा काढण्यापूर्वी राम पूर्णेकर यांनी निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी न्यायाची मागणी केली.