scorecardresearch

मुख्यमंत्र्यांकडून १५ आमदारांची जुळवाजुळव

रामदास आठवले यांचा दावा

मुख्यमंत्र्यांकडून १५ आमदारांची जुळवाजुळव
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. (संग्रहित छायाचित्र)

रामदास आठवले यांचा दावा

केंद्र व राज्यातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडली तरी भाजपचे राज्यातील सरकार पडणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे केला. शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर भाजपला १५  आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा आठवले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच अडीच वर्षांत विधानसभा निवडणुका होऊ नयेत, असे राज्यातील बहुतांश आमदारांना वाटत असून हेच आमदार सरकार टिकविण्यासाठी मदत करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असून त्यामध्ये शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. या आमदारांनी सत्तेतून पाठिंबा काढून घेतला तर सरकार पडेल, असे शिवसेनेला वाटते. मात्र शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर भाजपला सत्तेसाठी केवळ १५ आमदारांची जुळवाजुळव करावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखल्याने सरकार पडणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

भाजप-रिपाइं युती..

राज्यातील दहा महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप व रिपाइंची युती आहे. मात्र या निवडणुकीत काही ठिकाणी युती होऊ शकली नसून तिथे मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातही रिपाइंने ११ जागांची मागणी केली होती, परंतु भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात इन्कमिंग झाल्यामुळे त्यांना जागा वाटप करताना अडचण झाली. त्यामुळे ही युती होऊ शकली नसून रिपाइंने ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. असे असले तरी ११ जागांवर दोन्हीपैकी कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, याची चाचपणी करून त्याठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांना पाठिंबा देतील.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2017 at 02:04 IST

संबंधित बातम्या