ठाणे : पुण्यात दारूकांड झाल्यानंतर राज्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हातभट्ट्यांच्या दारूचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला सूचना केली आहे. हातभट्ट्यांना अधिकृत करा, यातून सरकाराल महसूल मिळेल. तसेच गोरगरीब नागरिकांचे प्राण वाचतील असे आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मंगळवारी भिवंडी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हातभट्टीची दारू प्यायल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही १८ ते १९ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे या हातभट्ट्या सुरु असून नशेसाठी त्यात वेगवेगळी रसायने टाकली जातात. अशा प्रकारामुळे गोर-गरिबांचा मृत्यू होतो असे आठवले म्हणाले, मजूर, माथाडी कामगार, इतर सफाई मजदूर अशा पद्धतीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद फार कमी असतो, सातत्याने रोज काबाड-कष्ट करून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या तणावातून अनेक लोक हात भट्टीची दारू पितात. पोलिसांनी कितीही हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या तरीही त्या हातभट्ट्या सुरुच असतात. या गल्लीमध्ये पोलिसांनी पकडले की, दुसऱ्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळे हे बंद होत नाही. आपल्याकडे पूर्णपणे दारुबंदी नाही. परदेशी वाईन शॉपला परवानगी आहे. म्हणून माझे व्यक्तिगत मत असे आहे, त्यास सगळे सहमत असतीलच असे नाही. पण हात भट्टीच्या दारूला जर परवानगी दिली तर त्याचा महसूल सरकारला मिळेल त्यानंतर हात भट्ट्यांवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच प्राणहानी होणार नाही. याचा विचार सरकारने करावा, असे आठवले म्हणाले.
