कल्याण – कचऱ्याने भरलेली कल्याण डोंबिवली शहरे मागील पाच वर्षापूर्वी कचरा मुक्त करण्याचा ध्यास घेऊन काम करणारे कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची बुधवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्याने पालिकेत आश्चर्य, तर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कचऱ्याच्या विषयावर स्वता अस्वस्थ असणारे आणि लोकांना कचरा विषयात अस्वस्थ करणारा अधिकारी म्हणून उपायुक्त कोकरे यांची ओळख होती.

त्यांचीच काहीही कारण नसताना शासनाने अचानक बदली केल्याने या बदली मागील झारीतील शुक्राचार्य कोण, असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. करोना महासाथीच्या काळात शासन, प्रशासन यंत्रणा या महासाथीपासून प्रत्येक जीव वाचविण्यासाठी धडपडत होत्या. या जीवघेण्या काळात सन २०२२ पासून उपायुक्त कोकरे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कल्याण, डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचा ध्यास घेऊन काम करत होते.

विविध स्तरातून उकिरडा म्हणून हिणवलेली ही दोन्ही शहरे कचरा मुक्त करण्यात उपायुक्त कोकरे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने महत्वाची भूमिका बजावली. शहराचा भौगोलिक ढाचा उंच सखल, चाळ, झोपडपट्टी, सामान्य, मध्यवर्गीय वस्तीसारखी असली तरी शहरे आपण दररोज स्वच्छ आणि कचरा मुक्त ठेऊ शकतो हा विचार लोकांच्या मनावर बिंबविण्यात उपायुक्त कोकरे यशस्वी झाले होते.

कचरा सोने

कचरा ही घाण नसून ते सोने आहे, हा विचार कोकरे यांनी कर्मचारी, लोकांच्या मनावर बिंबवला. पालिकेकडे दररोज विविध प्रकारचा जमा होणारा कचरा विकून पालिकेला कचऱ्याच्या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल मिळवून दिला. पहाटे साडे चार त रात्री १२ या वेळेत कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात फिरून, सोसायट्या, चाळी, झोपड्यांमध्ये स्वता जाऊन कोकरे यांनी कचराविषयक जनजागृती आणि शहर स्वच्छ ठेवणे ही कशी आपली सामुहिक जबाबदारी आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले. ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याचे फायदे लोकांना पटवून सांगितले. कचऱ्यामुळे स्वता अस्वस्थ राहून लोकांना या विषयासाठी अस्वस्थ करणे, त्यांच्यात परिवर्तन घडविणे हा कोकरे यांचा उद्देश आहे.

बदलीने विस्कटले

अडीच वर्षापूर्वी उपायुक्त कोकरे यांची कडोंमपातून बदली झाली. कोकरे यांनी कल्याण डोंबिवलीत तयार केलेला शून्य कचरा मुक्त शहराचा ढाचा विस्कटला. नवीन कोणत्याही अधिकाऱ्याला हा ढाचा सावरता आला नाही. शून्य कचरा मुक्तीकडे जाणारे शहर पुन्हा उकिरड्याकडे वाटचाल करत होते. पालिका घनकचरा विभागात कचरा विषयावर समर्पित भावाने काम करणारा एकही अधिकारी नव्हता. कोकरे यांनी सोसायट्यांमध्ये सुरू केलेले कचरा खत प्रकल्प बंद पडले होते. कचराभूमीवर विस्कटले पण आले होते.

कोकरे पुन्हा आले

कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न कसा सुटणार अशी चर्चा सुरू असताना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शासनाने रामदास कोकरे यांची पुन्हा कडोंमपात उपायुक्त म्हणून बदली केली. आपला आवडीचा घनकचरा विषय कोकरे यांनी हाती घेऊन पुन्हा नव्या दमाने शहर कचरा मुक्त, शून्य कचरा मोहीम यशस्वीपणे राबविण्यास सुरूवात केली. ओला, सुका कचरा वर्गीकरण ८५ टक्के करण्यात यश मिळवले. आता चांगल्यापैकी शहर शून्य कचरा मुक्तीकडे वाटचाल करत असताना शासनाला ‘हर्ष’वायू झाला. माशी शिंकली आणि कोकरे यांची कोठेही पदस्थापना न देता शासनाने तडकाफडकी बदली केली.

पालिकेचे राजकारण

पालिकेच्या सात प्रभागांमधील कचरा उचलणे आणि वहन काम खासगीकरणातून केले जाते. ही खासगीकरणाची यंत्रणा स्वतंत्रपणे पालिकेत काम करते. या यंत्रणेवर पालिकेचे नियंत्रण आहे. या यंत्रणेला योग्य निकष पूर्ण केल्यावर देयक देण्याचे निविदेत नमूद आहे. याविषयी उपायुक्त कोकरे कठोर होते. हे कठोरपण काहींना त्रासदायक ठरले. ठाण्यात ‘पाचर’ मारली गेली आणि त्या दाबाने कोकरे यांची अखेर बदली झाल्याची पालिकेत चर्चा आहे. शासनाचा हा ‘हर्ष’वायू पाचरी मारून आता किती अधिकाऱ्यांचे बळी घेणार आणि पालिका पदाधिकारी त्यांची किती दिवस पाठराखण करणार, अशीच चर्चा पालिकेत सुरू आहे.

हा दैनंदिन बदलीचा भाग आहे. शासन सेवेत असल्याने आपण कोठेतरी काम करायचे आहे. ते काम मी नियमित प्रामाणिक करतो. त्यामुळे अनेक पालिका कचरा मुक्त करण्यात आपणास यश आले.-रामदास कोकरे उपायुक्त, घनकचरा.