डोंबिवली – शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण करणारे शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या या नगरसेवकाची ओळख परेड घेऊन, सीसीटीव्ही चित्रणातील त्यांची ओळख पटवून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना यापुढे निवडणुकीसाठी बंदी घालावी. आणि संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही कायद्याचे राज्य आणि पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करतो हे देशाला दाखवून द्यावे, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन घडल्या घटनेची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केली.
एकीकडे लाडक्या बहिणींच्या नावाने गळे काढता आणि दुसरीकडे यांच्या पक्षाचे नगरसेवक रुग्ण सेवा देणाऱ्या डाॅक्टर महिलेवर हात उचलतात. हा कुठला न्याय, अशा शब्दात आदित्य ठाकेर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्वता गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यांच्याकडे कोणी गेला नाहीतर तुझे नगरसेवक पद बरखास्त करतो असे ते धमकावत असतात, मग आता खरच हिंमत असेल तर तुम्ही रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करा. त्यांना निवडणूक लढविण्यापासून बंदी घाला. आता कारवाईची पोकळ आश्वासने देऊन उपयोग नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे. ती हिम्मत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवावी, असे ठाकरे म्हणाले.
महिलेवर हात उचलायचा नाही ही शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवण दिली आहे. त्यामुळे त्या डाॅक्टर महिलेवर आपण हात उचलला नाही, असे रमेश म्हात्रे बोलत असले तरी, हे लोक माझ्या आजोबांचे (बाळासाहेब ठाकरे) नाव घेऊन भंपकगिरी करत आहेत. हे खरच शिवसेनाप्रमुखांना मानणारे असते तर ते गुवाहटीला पळाले नसते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
आताचा महाराष्ट्र पाच लोकांनी खूप वाईट वळणार नेऊन ठेवला आहे. तो पुन्हा वळणावर आणण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, अशी खंतही ठाकरे यांननी व्यक्त केली. रुग्णालयात आदित्य ठाकरे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सादिया पिंजारी यांच्याकडून घडल्या घटनेची माहिती घेतली. शिवसेना नेते विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष अभिजीत सावंत यावेळी उपस्थित होते.
