कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी विष्णुनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक केली आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

याप्रकरणात नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे खासगी अंगरक्षक म्हणून मिरविणाऱ्या या समर्थकांमधील रमेश लक्ष्मण पवार (५०, रा. वडारवाडी, डोंबिवली पूर्व), प्रकाश उर्फ प्रकाश उध्दव निकम (३५, रा. सुंदरा आई आर्केड, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम), अक्षय शरद कारंडे (३०, रा. कलम श्री सोसायटी, कोपर क्राॅस रोड, डोंबिवली पश्चिम) यांना पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली होती.

रुग्णालयात येऊन रमेश म्हात्रे यांनी प्रथम डाॅक्टरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि डाॅ. वैभव साळुंखे, डाॅ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केली. तसेच, दोन परिचारिकांना अरेरावीची भाषा केली होती. म्हात्रे या प्रकरणातील मुख्य आरोपी असताना ते मोकाट फिरत आहेत. ते माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यासाठी जात असल्याने वैद्यकीय संघटना, जाणते नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

म्हात्रेंच्या अटकेसाठी आग्रह

कल्याण, डोंबिवली शहर परिसरासह राज्यातील विविध औषधोपचरांच्या खासगी डाॅक्टरांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील नवतरूण महिला, पुरूष डाॅक्टरांसोबत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेल्या गैरकृत्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शासनाने स्वताहून पुढाकार घेऊन या नगरसेवकावर कठोर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया राज्यभरातील डाॅक्टर, जाणते नागरिक, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांकडून उमटत होत्या. पालिका आरोग्य कर्मचारी कालपासून काम बंद आंदोलनात सहभागी आहेत.

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन चालू असताना ही घटना घडल्याने बुधवारी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत लोकलने डोंबिवलीत आले. शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सादिया पिंजारी यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर आमदार पवार यांनी सांगितले, बुधवारी संध्याकाळ पर्यंत पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक करावी. अन्यथा गुरूवारी महाविकास आघाडीतर्फे रुग्णालयात आंदोलन केले जाईल.

रुग्णसेवा देणाऱ्यांना असे नगरसेवक मारहाण करत असतील तर ते त्यांच्या विकृतीचे प्रदर्शन करतात. पोलिसांनी अशांची कपडे काढुन धिंड काढुन अटक करावी. या नगरसेवकाच्या पक्षाच्या नेत्यांनी या मारकुट्या नगरसेवकाची गंभीर दखल घेऊन त्याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिसांवरील अटकेसाठी दबाव वाढला होता.

शिंदे शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी मारहाण झालेल्या डाॅक्टरांच्या पाठीशी शिवसेना ठाम आहे. या प्रकरणाचे शिवसेना कोणत्याही प्रकारचे समर्थन करणार नाही. हा गुन्हा करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. म्हात्रे यांना शिंदे शिवसेनेने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. राज्यभर म्हात्रे यांच्या अटकेसाठी दबाव वाढत होता. अखेर बुधवारी संध्याकाळी रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या गुन्ह्यातील अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या आता चार झाली आहे.