Ramesh Mhatre Goa Anjuna Resort: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण केल्यापासून पोलीस कोठडी, त्यानंतर आधारवाडी तुरूंग व आता काही दिवस महाराष्ट्राच्या बाहेर गोवा येथे थांबावे लागणार असल्याने शिंदे शिवसेनेच्या कोपर प्रभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे गोवा येथील अंजुनी रिसाॅर्टवर मागील काही दिवसांपासून मुक्कामी आहे. रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्या भेटीसाठी त्याचे डोंबिवलीतील काही समर्थक, निष्ठावान कार्यकर्ते, व्यावसायिक खास वाहने करून म्हात्रे याची बरीखुशाली विचारण्यासाठी गोव्यात हजेरी लावत आहेत.

यानिमित्त रमेश म्हात्रे याची भेट व त्यानिमित्त गोवा पर्यटन होत आहे. त्यामुळे सात ते आठ कार्यकर्ते, समर्थक एकत्र येऊन विशेष वाहन करून ही मंडळी काही दिवसांपासून गोवा येथे जात आहेत. गोवा येथे जाताना वाटेत काही समर्थकांची कोकणातील गावे लागतात. त्या निमित्ताने गावीपण एक फेरी होऊन जाते, असा विचार करून ही मंडळी म्हात्रे याच्या भेटीचे निमित्त करून आपला दौरा आयोजित करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

जामीन रद्द झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून रमेश म्हात्रे कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात २० दिवस होता. याठिकाणी बाहेरील कोणालाही त्याला भेटू दिले जात नव्हते. म्हात्रेच्या अवतीभोवती नियमित वावरण्याची सवय असलेले त्याचे हितचिंतक आपले ‘दादा’ जवळ नसल्याने अस्वस्थ होते. म्हात्रे कल्याण-डोंबिवली पालिकेत, कुठेही सार्वजनिक कार्यक्रमाला निघाला की त्याच्या स्वत: व मागील खासगी सुरक्षा रक्षकांच्या वाहनात त्याचे समर्थक दाटीवाटीने बसून ‘दादा’च्या सुरक्षेला प्राधान्य देत.

रमेश म्हात्रे हाच आपला सर्वेसर्वा अशा थाटात वावरणारे त्याचे समर्थक शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रेने वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव साळुंखे यांना मारहाण सुरू करताच, काही क्षणात त्याच्या पाठीमागे असलेल्या रमेश पवार, प्रमोद निकम व अक्षय कारंडे या समर्थकांनी डाॅ. साळुंखे यांना डाॅक्टर कक्षात मारहाण केली होती.

अनेक जण गोवा येथे जाऊन आले आहेत. तर काही जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा कोपर भागातील नागरिकांमध्ये आहे. कोपर प्रभागातील काही नागरिक मात्र आम्ही आता काहीसे निश्चिंत असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रमेश म्हात्रे पुन्हा डोंबिवलीत येणार आहे. त्यानंतर खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याला स्थानिक विष्णुनगर पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावायची आहे. गोवा येथेही त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात तीन दिवसांची हजेरी उच्च न्यायालयाकडून निश्चित करण्यात आली आहे. डाॅक्टर मारहाण प्रकरण घडल्यापासून शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी मोकळेपणाने रुग्णसेवा देत आहेत. अन्यथा येथील वातावरण नियमित तणावाखाली असल्याचे असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.