कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह डाॅ. वैभव साळुंखे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करणारा शिंदे शिवसेनेचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्यासह उर्वरित चार आरोपींची ओळख परेड मंगळवारी दुपारी कल्याणच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत आधारवाडी तुरुंगात पार पडली.

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या ओळख परेडच्या वेळी पीडित डाॅक्टर डाॅ. साळुंखे यांनी आरोपी रमेश म्हात्रेसह इतर चारही आरोपींना अचूक ओळखले असल्याची माहिती डाॅ. साळुंखे यांचे वकील ॲड. अभिनय अडसुळ यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्या. गौतम अंखड यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश म्हात्रे जामीन प्रकरण, डाॅक्टर मारहाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. रमेश म्हात्रे याने ज्या पद्धतीने अश्लील शिवीगाळ करत डाॅ. वैभव साळुंखे यांना मारहाण केली व वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या सर्व प्रकाराबद्दल उच्च न्यायालयाने वेळोवेळी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत रमेश म्हात्रेसह इतर आरोपींना जामीन देण्यास गेल्या १५ दिवसांत नकरा दिला.

रमेश म्हात्रेची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेता तो जामिनावर बाहेर आल्यावर तपास यंत्रणा, साक्षीदार यांच्यावर दबाव टाकील, अशी भीती उच्च न्यायालयातील सुनावणींच्यावेळी समन्वयक न्यायमित्र, फिर्यादी पक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने न्यायालयात व्यक्त करण्यात आली.

तसेच, याप्रकरणातील फिर्यादी डाॅ. साळुंखे रमेश म्हात्रेने मारहाण केल्यापासून मानसिक तणावाखाली आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर आलेले अनोळखी संपर्काने त्यांच्या जिवाला धोका असल्याची भीती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.

पोलीस बंदोबस्तात कल्याण

मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर डाॅ. साळुंखे यांनी जिवाला असलेला धोका विचारात घेऊन आपल्या आईसह डोंबिवलीहून वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी न्यायालयासमोर जबाब देण्यासाठी अनेक वेळा डाॅ. साळुंखेंना संपर्क केला. पण, सुरक्षेची हमी मिळत नसल्याने ते जबाबासाठी न्यायालयात येत नव्हते. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांचा जबाब वाशिम येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला. ओळख परेड करण्यासाठी डाॅ. साळुंखे यांना कल्याण येथे आणताना पोलीस बंदोबस्त मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांचे वकील ॲड. अडसुळ यांनी न्यायासनासमोर व्यक्त केले होते. त्याची दखल घेत डाॅ. साळुंखे यांना चोख पोलीस बंदोबस्तात कल्याणमध्ये आधारवाडी तुरूंग येथे मंगळवारी आणण्यात आले.

तुरूंगात ओळख परेड

वरिष्ठ पोलीस अधिकारी, तुरुंगाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात कल्याणच्या तहसीलदारांच्या समक्ष डाॅ. वैभव साळुंखे यांना ओळख परेडसाठी आरोपी रमेश म्हात्रे याच्यासह सहआरोपी रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय कारंडे व साधना संजय कारंडे (५२) यांच्या समोर उभे केले. त्यावेळी डाॅ. साळुंखे यांनी आपणास शिवीगाळ करत मारहाण करणारे हेच ते इसम असल्याचे तपास यंत्रणेला सांगितले.

तक्रारदार, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन ते अधिक तपासणीसाठी ते न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले. या ओळख परडेमुळे तपासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्याचे ॲड. अडसुळ म्हणाले.

९४ फोन काॅल्स

रमेश म्हात्रेने डाॅ. वैभव साळुंखे यांना रुग्णालयात मारहाण केल्यानंतर त्यांना विविध प्रकारचा दबाव टाकणारे अनोळखी, काही संपर्कातील सुमारे ९४ मोबाइल फोन त्यांच्या मोबाइलवर आल्याचे तपासातून उघड झाले आहे. या अनोळखी संपर्कामुळे जिवाच्या भीतीने डाॅ. साळुंखे यांनी आपला फोन काही दिवस बंद ठेवला होता. या फोन काॅल्सची तांत्रिक चिकित्सा तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे.