KDMC Corporator Ramesh Mhatre: शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीला हजेरी लावल्यानंतर शिंदे शिवसेनेचा डोंबिवलीतील कोपर प्रभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे शुक्रवारी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेला (महासभा) हजर झाला. आपले नगरसेवक पद वाचविण्यासाठी म्हात्रेने सभागृहात ही हजेरी लावल्याची चर्चा महानगरपालिकेत होती.

पालघर येथील डाॅक्टरला शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातून निलंबनाची कारवाई केली. मग, पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरला बेदम मारहाण करूनही रमेश म्हात्रेवर शिंदे शिवसेनेने तंबी देणे, शिस्तभंगाची कारवाई करण्या व्यतिरिक्त त्याच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई न केल्याने विविध क्षेत्रातील नागरिक, वैद्यकीय संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पद वाचविण्यासाठी हजेरी

६ जुलै रोजी रात्री शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंखे यांना नगरसेवक रमेश म्हात्रे याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे म्हात्रेचा कल्याण न्यायालयाने दिलेला जामीन रद्द झाला. त्यानंतर रमेश म्हात्रे गोव्यात हद्दपारी झाली. या सर्व प्रकाराने जुलै, ऑगस्टमधील पालिका मासिक महासभांना रमेश म्हात्रेला हजेरी लावता आली नाही. सलग तीन वेळा नगरसेवक गैरहजर राहिला तर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाने त्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते. त्यामुळे आपले नगरसेवक रद्द होऊ नये म्हणून रमेश म्हात्रे याने आपल्या सल्लागारांच्या सूचनेप्रमाणे कल्याण न्यायालयातील हजेरीनंतर पालिकेच्या महासभेला उपस्थिती लावणे पसंत केले.

सभागृहात स्वागत

रमेश म्हात्रे नेहमीप्रमाणे महासभेला येणार नाही म्हणून त्याची गैरहजेरी लावून महापौरांनी सभा सुरू केली होती. दरम्यान, रमेश म्हात्रे सभागृहात हजर झाले. त्यामुळे सचिव किशोर शेळके यांनी त्यांच्या गैरहजेरी व उपस्थितीची माहिती सभागृहाला दिली. शब्दसुमनांनी सभागृहात त्यांचे स्वागत केले. यावेळी विरोध बाकावरील सदस्य त्यांच्या उपस्थितीविषयी आणि डाॅक्टर मारहाण प्रकरणाविषयी हरकत घेतील अशी चर्चा होती. पण विरोधकांनी गुपचिळीचे धोरण स्वीकारले. सभागृहात रमेश म्हात्रे सर्वात मागच्या आसनावर बसला होता. म्हात्रे त्याच्याशेजारी बसलेल्या जयवंत भोईर, सचिन पोटे व इतर नगरसेवकांची गप्पा मारत होता.

पद रद्दसाठी पाठपुरावा

रमेश म्हात्रेचा मुलगा प्रवीण म्हात्रे यांनी जुनी डोंबिवलीत बेकायदा बांधकाम केले आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फरार प्रवीणचा विष्णुनगर पोलीस शोध घेत आहेत. रक्ताच्या नात्यामधील कुणीही बेकायदा बांधकाम केले तर कुटुंबातील संबंधिताचे नगरसेवक पद रद्द होते. या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना नियोजन कायद्याने रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद मुलगा प्रवीण म्हात्रेने केलेल्या बेकायदा बांधकामामुळे रद्द करण्यात यावे, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते कल्पेश जोशी गेले आठ महिने कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त, कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहेत.

राजकीय दबावामुळे पालिकेकडून रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द केले जात नसल्याने, तक्रारदार कल्पेश जोशी यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.