ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि समर्थकांनी केलेल्या मारहाणी प्रकरणामुळे सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्था कमालीची दडपणाखाली आली आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते.
शास्रीनगर प्रमाणे कळवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णायांसह इतर शासकीय रुग्णालयांतही डाॅक्टर किंवा परिचारिकांना राजकीय दबावाचा सामना सहन करावा लागत अशी प्रतिक्रिया बुधवारी या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत होती. ‘कोणीही यावे, आम्हाला मारहाण करावी’ हे नित्याचे असून राजकीय आशिर्वाद आणि शासनाची बोटचेपी भूमीका यामुळे आम्ही सतत दडपणाखाली असतो अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांपैकी कळवा येथील ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय ही सर्वात मोठी रुग्णालये आहेत. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून या रुग्णालयात उपचारासाठी नागरिक येत असतात. परंतु राजकीय संघटनेच्या गल्लीबोळातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून दबाव नित्याचे झाले आहे.
शास्त्रीनगर येथील प्रकरणानंतर डाॅक्टर आणि परिचारिकांमध्ये दडपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी उपाययोजना नसल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. तर खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांकडूनही मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील प्रसिद्ध डाॅक्टरांनी ‘लोकसत्ता’कडे त्यांची प्रतिक्रिया देताना आम्ही नेहमीच दडपणाखाली असल्याचे म्हटले. तसेच आमच्या मुलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे म्हटले.
ठाण्यातील डाॅ. अभिजीत बापट यांनी सांगितले की, प्रत्येक डाॅक्टरांमध्ये पूर्वीपासून भिती आहे. सरकारी रुग्णालयात पुरशा आरोग्य सुविधा नाहीत. हे डाॅक्टरांचे अपयश नाही, तर महापालिका आणि राज्य सरकारचे अपयश आहे. शास्त्रीनगर येथे महिला मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. परंतु आपली यंत्रणा सुस्त असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारी रुग्णालयात डाॅक्टर, पारिचारिकांसाठी सुरक्षा रक्षक नाहीत. सरकारी रुग्णालयात अनेक पदे रिकामी आहेत. ही पदे भरली जात नाहीत. कारण तेथील वातावरण असुरक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक वेळी मोठ्या खासगी रुग्णालयात जावे लागते. डाॅक्टरांच्या सुरक्षेच्या कायदे तसेच पडून आहेत. डाॅक्टरांना मारहाण, शिवीगाळ यांसारख्या प्रकरणांमुळे आमच्या मुलांमध्ये भिती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तर डाॅ. पांडुरंग भोसले यांनीही सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य सुविधेकडे लक्ष वेधले. सरकारी रुग्णालयात अपुऱ्या सुविधा आहेत, ही डाॅक्टरांची चूक नाही. हा प्रकार लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या गुंडाचे अपयश दाखविणारे आहे. लोकप्रतिनिधी सामान्य डाॅक्टरांवर हल्ला करत आहेत. सरकारी रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग वाढविणे आवश्यक आहे. परंतु सरकारकडे त्याची मानसिकता नाही. मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे डाॅ. भोसले यांनी सांगितले.
सरकारने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संरक्षण कायद्याची अमलबजावणी करून रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दल किंवा खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने लागू कराव्यात. तसेच डाॅक्टरांना मारहाण घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये गुरुवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. – डाॅ. अथर्व शिंदे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड.
शास्र्तीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर कल्याण शहरात खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. रमेश म्हात्रे वर कठोर कारवाई झाली पाहिजे.- डाॅ. संतोष कदम, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य तथा राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष.
