ठाणे : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिकांना शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मारहाण केली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित मारहाण प्रकरणाला पक्षाचे कोणतेही समर्थन नसल्याचे स्पष्ट करत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, पुढील कारवाईबाबत निर्णय पक्षाची शिस्तपालन समिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिकांना शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी सोमवारी संध्याकाळी जीवघेणी मारहाण केली. यात एक महिला डाॅक्टर, दोन परिचारिका आणि एक डाॅक्टरचा समावेश आहे. ‘तुम्ही रुग्णालयातून फक्त बाहेर पडा. तुम्हाला संपून टाकतो,’ अशी धमकीही रमेश म्हात्रे यांनी या डाॅक्टरांना दिली.

या घटनेनंतर मात्र यांच्या अटकेच्या मागणीसाठी डॉक्टरांनी कल्याण डोंबिलेत का बंद आंदोलन सुरू केले आहे. तर राज्यभरातील डॉक्टरांकडून या घटनेच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत आहेत. असतानाच, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रमेश म्हात्रे मारहाण प्रकरणावर खासदार म्हस्के यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जी घटना घडली, तिचे पक्षाने समर्थन केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हात्रे हे पाच ते सहा वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असून त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात पुढील कारवाईबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तसेच पक्षाची शिस्तपालन समितीही प्रकरणाचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई निश्चित करेल, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

खासदारांशी संबंधित विषय वेगळा होता, तर हे प्रकरण वेगळे आहे. कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीत पक्ष कुठेही कमी पडणार नाही, “असेही त्यांनी सांगितले.