डोंबिवली: नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयातील डाॅक्टरांना केलेल्या मारहाणीबद्दल आणि परिचारिकांशी केलेल्या अरेरावीबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका नगरसेवकामुळे पक्षाला नाहक टिकेला सामोरे जावे लागत असल्याबद्दल शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी दोन दिवस नगरसेवक म्हात्रे यांना कठोर शब्दात सुनावल्याने अखेर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उपरती झाली आणि बुधवारी सकाळी माध्यमांसमोर येऊन त्यांनी रुग्णालयात घडल्या गैरप्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली.
नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, की शास्त्रीनगर रुग्णालयात मंगळवारी रात्री जो प्रकार घडला त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करत आहे. मी त्या महिला डाॅक्टरवर हात उचलेला नाही. ती मला माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे मी तिचा एकेरी उल्लेख करतो. मी ठासुन सांगतो आणि सीसीटीव्ही चित्रण बघितले तरी मी त्या डाॅक्टर मुलीवर हात उचलून तिला मारहाण केलेली नाही.
शिवसेनाप्रमुखांचे स्मरण
आम्ही रुग्णालयात आल्यानंतर त्या डाॅक्टर महिलेला आमचे म्हणणे, तक्रार काय आहे ते ऐकून घ्या म्हणू सांगत होतो. पण ती डाॅक्टर महिला सतत कानाला मोबाईल लावून बोलत होती. आमच्याकडे तिचे लक्ष नव्हते. आणि ती काही ऐकून घेत नव्हती. त्यामुळे मी तिच्या कानाचा मोबाईल खाली करण्यासाठी हात वर केला. आणि आणि आमचे म्हणणे ऐकून घे म्हणून सूचना केली. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला कधीही महिलेवर हात उचलण्याची शिकवण दिली नाही आणि तो संस्कार आमच्यावर नाही. त्यामुळे मी असे कृत्य केले नाही. असा प्रकार यापुढे माझ्याकडून होणार नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले.
त्यानंतर रुग्णालयात येण्यापूर्वी काय घडले. आणि आपण का रुग्णालयात आलो. गरोदर महिला रुग्णालयात आल्यावर तिचे नातेवाईक महिलेला दाखल करण्यासाठी कसे प्रयत्न करत होते. त्यांना रुग्णालय प्रशासन कसे दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करत होते, याची माहिती या महिलेचे नातेवाईकच तुम्हाला देतील, असे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले.
मारहाणीचा गैरप्रकार घडत होता. त्यावेळी गरोदर महिलेची नातेवाईक महिलाही त्यावेळी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला देण्याऐवजी डाॅ. सृष्टी बाविस्कर यांच्याशी वाद घालत होती. या महिलेमुळेच वाद वाढल्याचे प्रत्यक्षदर्शी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मारहाणीचे समर्थन
डोंबिवलीतील शिंदे शिवसेनेचा उच्च स्वराचा एक ज्येष्ठ पदाधिकारी बुधवारी सकाळपासून शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून झालेल्या मारहाणीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या नावे असलेल्या दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करून आमच्या नगरसेवकाने कसा महान प्रताप केला याची प्रसिध्द करून पक्षावर उठलेली झोड थोपविण्याचा प्रयत्न करत होता. या पदाधिकाऱ्याच्या या कृत्याविषयी शिवसेना पक्षातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
‘वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सांगून गेले आहेत. जिगरबाज जगा आणि अन्याय दिसेल तेथे लाथ मारा. गोरगरीबांना जो त्रास देईल त्याला सोडू नका. त्याला दोन हाणा’. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक काल देखील त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत होता आणि आज देखील होय, आज देखील त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागत आहे. अशा या पदाधिकाऱ्याच्या या दृश्यध्वनी चित्रफिती शिवसेनाप्रमुखांच्या नावाने सामायिक करून हा पदाधिकारी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कृत्याचे समर्थन करत असल्याचे पाहून डाॅक्टर, नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
