ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटीकरण तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी सुरु केलेल्या दिशा प्रकल्प पुढे घेऊन जात त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासह ग्रामीण भागातील गावे टॅंकरमुक्त करण्यावर भर देणार असल्याची माहिती नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दोन महिन्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रणजित यादव यांची नियुक्ती झाली.
रणजित यादव यांनी गुरुवारी पदभार स्विकारला. रणजित यादव हे २०२२ च्या तुकडीतील ‘आयएएस’ अधिकारी आहेत. यापूर्वी ते रणजित यादव सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली या पदावर कार्यरत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील ‘आदि कर्मयोगी’ अभियानांतर्गत जिल्ह्याला राष्ट्रपतीकडून उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरव मिळण्यात यादव यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच चामोर्शी एमआयडीसी रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादन, ‘पीएम जनमन’, ‘धरती आबा अभियान’ यांसारख्या आदिवासी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच ई-ऑफिस आणि ई-गव्हर्नन्स उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, विकासाभिमुख करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी प्रशासनात कार्यक्षमता, वेळबद्धता आणि फलनिष्पत्ती करण्यासाठी भर देण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला आणि बालकल्याण आदि विभागांमध्ये समन्वय साधून तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकारक प्रशासन राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यावर तत्काळ आणि सकारात्मक कार्यवाही केली जाईल तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य, अनुभव आणि नवकल्पनांचा योग्य उपयोग करून ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाला नवे बळ देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
