मुरबाडमधील स्पर्धेत ५८ रानभाज्यांची सचित्र नोंद | Loksatta

मुरबाडमधील स्पर्धेत ५८ रानभाज्यांची सचित्र नोंद

विशेष म्हणजे या रानभाज्या त्यांनी शिजवूनही आणल्या होत्या.

मुरबाडमधील स्पर्धेत ५८ रानभाज्यांची सचित्र नोंद
रानभाज्यांच्या स्पर्धेत आतापर्यंत ५८ रानभाज्यांची नोंद झाली असून आता त्यांचे आहारमूल्य तपासण्यात येणार आहे.

निसर्गदेवाच्या जत्रेतील उपक्रम; आहारमूल्य तपासून लागवडीस प्रोत्साहन

आदिवासीबहुल तालुका असलेल्या मुरबाडमधील आदिवासींच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासोबतच येथील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून मुरबाडमध्ये जागतिक पर्यावरणदिनी निसर्गदेवाची जत्रा भरवण्यात येत आहे. या जत्रेत घेण्यात येणाऱ्या रानभाज्यांच्या स्पर्धेत आतापर्यंत ५८ रानभाज्यांची नोंद झाली असून आता त्यांचे आहारमूल्य तपासण्यात येणार आहे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पर्यावरण दिनी सोमवारी श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने मुरबाडमधील माळ भांगवाडी येथे निसर्गदेवाची जत्रा भरविण्यात आली होती. त्यात नैसर्गिक साधनांद्वारे रांगोळी काढणे, पानांवरून झाड ओळखणे, चित्रकला आदी स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. मात्र दर वर्षीप्रमाणे रानभाज्यांची स्पर्धा जत्रेचे प्रमुख आकर्षण होते. भांगवाडी, शिरवाडी, मढवाडी, सिंगापूर (काटय़ाची वाडी, वाघाची वाडी), भिऱ्याची वाडी, शिरसोनवाडी आदी आदिवासी पाडय़ांवरील महिलांनी आपापल्या परिसरात आढळणाऱ्या रानभाज्या स्पर्धेत मांडल्या होत्या. रानभाज्या त्यांच्या नावानिशी मांडल्यामुळे जत्रेत उपस्थित शहरवासीयांना त्यांची माहिती घेता आली.

विशेष म्हणजे या रानभाज्या त्यांनी शिजवूनही आणल्या होत्या. कांदा, मिरची आणि लसणाची फोडणी दिलेल्या या भाज्या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी चाखल्या. काही भाज्या फक्त उकडून आणल्या होत्या, तर काही भाज्यांच्या चटण्याही होत्या. कुडा, लवंडी, भातरभिनी, मोहदोडा, खुरासनी, टेंभरूण, घोलू, तेरा, लवंडी, चायवळ, भोपा (सुरणाचे फूल) मोरबा, वांघोट आदी तब्बल ४२ प्रकारच्या रानभाज्या यंदाच्या स्पर्धेत होत्या. याशिवाय कच्च्या पपई, शेवग्याची पाने, टाकळा तसेच भेंडी आदी भाज्याही स्पर्धेत मांडण्यात आल्या होत्या. कोकमाच्या पानांच्या साराला (कढी) विशेष पसंती मिळाली.चार वर्षांत ५८ प्रकारच्या रानभाज्या आढळल्याची माहिती या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड्. सुरेखा दळवी आणि पद्मावती गुप्ते यांनी दिली. शहरवासीयांमध्ये सुपरिचित असलेली भारंगीची भाजी यंदा अद्याप उगवलेली नाही. त्यामुळे जत्रेत ती नव्हती.

रानमेवा बाजार आठवडाभरात

सामूहिक वनपट्टे राखणाऱ्या आदिवासी पाडय़ांच्या मागणीनुसार वन विभागाने उपलब्ध करून दिलेला रानमेवा बाजार येत्या आठवडाभरात सुरू होईल, अशी माहिती ठाणे वनविभागाचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी जत्रेत दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2017 at 04:24 IST
Next Story
ठाणे कला भवनात काश्मीरचा इतिहास