ठाणे : ठाणे महापालिका उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेत विश्वनाथ केळकर हे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे करोना रुग्णालयाचा कारभार असताना त्यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली होती. दरम्यान, केळकर यांनी बुधवारी संबंधित महिला, बिनु वर्गिस आणि नाझीया सय्यद या तिघांविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली आहे.  काही दिवसांपूर्वीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्येही बिनु वर्गिस याचे नाव आहे. असे पोलिसांनी सांगितले.