लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी येथील पल्स रुग्णालयाचे डॉक्टर देवेंद्र धोपटे (४८) यांच्या विरुध्द त्यांच्याच रुग्णालयातील एका विवाहित महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा काल दाखल केला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वेतनवाढ करण्याची मागणी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याकडे डॉ. धोपटे यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, एक ३४ वर्षाची विवाहित महिला डॉ. धोपटे यांच्या बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील संदीप हॉटेल जवळील पल्स रुग्णालयात रुग्णांची देयके तयार करण्याची कामे करते.
आणखी वाचा-ठाणे: शिळफाटा येथे रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
रुग्णालयात काम करुन अडीच वर्ष झाल्याने आपली वेतनवाढ करावी म्हणून ही महिला बुधवारी दुपारी डॉ. देवेंद्र धोपटे यांच्या दालनात गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्याशी अश्लील बोलून ‘तुला मी यापूर्वी काय बोललो होतो त्याची आठवण कर. वेतनश्रेणी वाढविली तर तु मला काय देशील,’ अशी अश्लील भाषा केली. महिला कर्मचाऱ्याने त्यांना अशा बोलण्यासपासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या महिलेच्या शरीरयष्टीवर डॉक्टरांनी अश्लील भाष्य केले.
वेतनवाढ करण्याची मागणी करताना डॉ. धोपटे यांनी स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केल्याने संबंधित महिला कर्मचारी व्यथित झाली. तिने डॉक्टर विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.