अंबरनाथ: कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण तसेच बदलापूर शहरातील चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संताप असताना अंबरनाथ शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या दिवंगत वडिलांच्या मित्रानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय निसार ठाणगे या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरुणी तिच्या आईसोबत राहते. आरोपी निसार ठाणगे याची पीडित मुलीच्या वडिलांशी मैत्री होती. पीडित मुलीच्या वडिलांच्या निधनानंतरही ठाणगे याने कौटुंबिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे होते. गेल्या आठवड्यात ९ ऑगस्ट रोजी काही साहित्य घेण्याच्या बहाण्याने ठाणगे याने घरात प्रवेश केला. ही तरुणी घरात एकटी असताना निसार ठाणगे याने संधी साधत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तसेच झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीसह आईने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिसांनी आरोपी निसार ठाणगे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
हेही वाचा – बदलापूर : मुलींच्या अत्याचाराप्रकरणी मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, शाळेचा माफीनामा
अंबरनाथ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलांचे अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी शहरातून केली जाते आहे.