मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना कोपरी भागात घडली असून याप्रकरणी पीडित मुलीच्या मित्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
ही मुलगी मद्याच्या अमलाखाली असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
घोडबंदर भागात ही पीडित मुलगी राहात असून ३० सप्टेंबरला तिच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी ती दुपारच्या वेळेस मित्रासोबत दुचाकीवरून गेली होती. त्याने तिला कोपरी भागातील एका खोलीत नेले. तिथे मद्याच्या नशेत असताना मित्राच्या चुलत बहिणीने तिला मारहाण केली. यानंतर नशेत असतानाच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या वेळी तिथे तिचा मित्र आणि आणखी एक जण उपस्थित होता. त्यामुळे तिने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिचा मित्र, त्याची चुलत बहीण आणि त्यांचा एक साथीदार अशा तिघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.