डोंबिवली- दक्षिण आफ्रिकेतील मूळ निवासी असलेला रणगोजा दुर्मिळ पक्षी पाच हजार किलोमीटरचे अंतर पार करून डोंबिवली जवळील भोपर गाव टेकडी भागात दाखल झाला आहे. येथील एका पक्षीप्रेमीच्या नजरेत सकाळच्या वेळेत हा चिमणीसारखा दिसणारा पक्षी दिसून आला आहे. रणगोजा आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी निसर्गप्रेमी सरसावले आहेत.
हेही वाचा >>> वास्तुविशारद आस्थापनांमधील परप्रांतीय आरेखकांकडून चुकीचे बांधकाम आराखडे? ज्येष्ठ वास्तुविशारदांची माहिती
डोंबिवलीतील आहारतज्ज्ञ आणि पक्षीप्रेमी डाॅ. महेश पाटील नियमित डोंबिवली जवळील भोपर टेकडी भागात फिरण्यासाठी जातात. सोबत ते आपला कॅमेरा ठेवतात. भोपर भागात नेहमीप्रमाणे फिरत असताना त्यांना चिमणीसारखा झाडांवर थुईथुई करणारा पक्षी दिसला. डाॅ. पाटील यांनी आपल्या भेदक कॅमेऱ्याने त्या पक्ष्याचे छायाचित्र टिपून निरखून पाहताच, तो युरोप खंडात वास्तव्यास असलेला दक्षिण आफ्रिकेतील मूळ निवासी असलेला दुर्मिळ रणगोजा (डेझर्ट व्हिटर) उर्फ रणगप्पीदास आढळून आला.
हेही वाचा >>> घोडबंदर कोंडी फोडण्यासाठी ब्रम्हांड सिग्नल आणि तत्त्वज्ञान विद्यापीठाचा वळण रस्ता अचानक बंद; स्थानिकांची नाराजी
युरोपातील अनेक पक्षी थंडीच्या दिवसात भारताच्या विविध भागात स्थलांतरित होतात. अशाच स्थलांतरितांमधील रणगोजा पक्षी डोंबिवलीत आला आहे. नोव्हेंबरमध्ये हे पाहुणे स्थलांतरला सुरुवात करुन महाराष्ट्रातील इच्छित स्थळी पोहचतात. दक्षिण आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे रणगोजाचे मूळ निवासस्थान. अतिशय चपळ असलेला रणगोजा चिमणीसारखा दिसतो. पिवळट पांढऱ्या रंगाचा कंठ, डोक्याखालील भाग काळा, भिवयी काळसर ही रणगोजाचे रुप. विणीच्या काळात ते बलुचिस्तान भागात असतात. हिवाळ्यात ते राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात संचार करतात, असे डाॅ. पाटील म्हणाले. काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये दुर्मिळ शिंगाळा नावाचे घुबड आढळून आले होते. त्यानंतर रणगोजा आढळून आल्याने निसर्गप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत. डो्ंबिवली परिसरातील उंबार्ली, भोपर, खाडी किनारा, मलंगगड, येऊन भागात १३४ प्रजातींचे पक्षी आढळून येतात. ऋतुमानाप्रमाणे २२ प्रकारचे विदेशातील पक्षी डोंबिवली भागात आढळतात, असे पक्षीप्रेमींनी सांगितले.