शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात येऊन देवीचं दर्शन घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात त्या सहभागी झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, ही गर्दी बाहेरून आणण्यात आली होती, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच, रश्मी ठाकरेंनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केल्याचं टीकास्र शिंदे गटाकडून सोडण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्मी ठाकरेंनी गुरुवारी टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथे आरतीदेखील केली. यावेळी रश्मी ठाकरेंनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. यावेळी ठाण्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. यानंतर संध्याकाळी शिंदे गटाच्या ठाणे महिला संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाणे भेटीवर तोंडसुख घेतलं आहे.

“शक्तीप्रदर्शनासाठी आयोगानं वेळ दिली आहे”

निवडणूक चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्याचा संदर्भत देत मीनाक्षी शिंदेंनी रश्मी ठाकरेंना आणि शिवसेनेला टोला लगावला. “हे काही शक्तीप्रदर्शन करण्याचं स्थान नाही. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे वेळ दिली आहे. तेव्हा जर शक्तीप्रदर्शन केलं तर ते चालू शकेल. इथे शक्तीप्रदर्शन करून कोणतंही चिन्ह मिळणार नाही. कारण देवीच्या हातात धनुष्यबाण नाहीये, त्रिशूळ आहे. त्यामुळे इथे येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नव्हती”, असं त्या म्हणाल्या.

“मुंबईबाहेरून गर्दी जमवावी लागली”

दरम्यान, रश्मी ठाकरे ठाण्यात आल्या, तेव्हा जमलेली गर्दी मुंबईबाहेरून आणली होती, असा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. “काल आम्ही म्हणालो होतो की रश्मी वहिनी आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण आम्हाला कळलं की ठाण्यातल्या महिला आघाडीपैकी कुणीच त्यांच्यासोबत नाही. म्हणून मुंबईबाहेरून त्यांना गर्दी मागवावी लागली. दुपारी तीन वाजल्यापासून ठाण्याकडे बसेस रवाना करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं”, असं शिंदे म्हणाल्या.

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी

“त्यांनी सांगितलं की आम्ही दर्शन घ्यायला येतोय. पण इथे आल्यावर त्यांनी माईकवर घोषणाबाजी केली. बाहेरच्या लोकांना घेऊन शक्तीप्रदर्शन करून त्या गेल्या. हा इव्हेंटच होता. आरती केली असं कुठेच वाटलं नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi thackeray thane visit eknath shinde group targets shivsena pmw
First published on: 30-09-2022 at 10:16 IST