महापालिका क्षेत्रात ४०हून अधिक बोगस दुकाने; कारवाईसाठी समिती नियुक्त
शिधावाटप यंत्रणांतील गैरव्यवहार दूर करून ही साखळी पारदर्शक करण्यासाठी सरकारी पातळीवर पावले उचलण्यात येत असली, तरी स्थानिक पातळीवर अजूनही भ्रष्टाचार या यंत्रणेच्या मुळात मुरलेला आहे. वसई-विरार शहरातील अन्नपुरवठा खात्यातील अनागोंदीबाबत वेळावेळी तक्रारी येत असतानाच या शहरांमध्ये कार्यरत असलेली ४० हून अधिक शिधावाटप दुकाने बोगस असल्याचे उजेडात येत आहे. नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या वसईच्या तहसीलदारांनी याची गंभीर दखल घेत अशी दुकाने शोधून त्यावर कारवाईसाठी समिती नियुक्त केली.
वसई-विरार शहरात १८२ शिधावाटप दुकाने आहेत. शासनाकडून जाहीरनामे काढून शिधावाटप दुकानदारांना परवाने दिले जात असतात. परंतु अनेक शिधावाटप दुकाने बोगस आणि नियमबा पद्धतीने चालवत असल्याचा आरोप वसईतील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुप्ता यांनी केला आहे. वसईतील किमान ४० हून अधिक शिधावाटप दुकाने बोगस असल्याचा त्यांचा आरोप आहे. या बोगस शिधावाटप दुकांनाचा शोध घेण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा ८ शिधावाटप दुकाने पूर्णपणे बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या आठ शिधावाटप दुकानदारांविरोधात त्यांनी २०१३ मध्ये तहसीलदार वसई, जिल्हाधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांना तक्रारी दिल्या होत्या. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही.
गुप्ता यांनी तक्रार केलेल्या आठ दुकानांकडे अधिकृत परवानेच नसून त्यांच्या नावावर अन्य कुणीतर दुकान चालवून रॉकेल आणि धान्य या जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. वसईत रेशनमाफिया सक्रिय असून एकाच्या नावावर अनेक शिधावाटप दुकाने आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते राजरोसपणे ही दुकाने चालवत आहेत. किमान ४० शिधावाटप दुकाने ही बोगस असून त्यातून धान्य आणि रॉकेलचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालघर जिल्हा पुरवठा निरीक्षक उमेश बिरारी यांनी शिधावाटप दुकानात भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य केले आहे. आमच्याकडे आलेल्या अनेक तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. वसईच्या तहसीलदारांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. जिल्हा नवीन असल्याने कारवाईसाठी वेळ लागत असल्याचे ते म्हणाले. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. वसईच्या पूर्वीच्या तहसीलदारांनी दिलेल्या अहवालात विसंगती होती. कारवाई होत नसल्याने हे रेशनमाफिया राजरोसपणे वसईत धंदा करून लूट करत असल्याचे ते म्हणाले.

मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. परंतु बोगस शिधावाटप दुकानांचा शोध घेण्यासाठी एक समितीे स्थापन केलीे आहे. आठवडाभरात ही समिती सर्व दुकानांचे परवाने तपासून त्याबाबतचा अहवाल सादर करेल. त्यानंतर आम्ही पुढचीे कारवाई करू.
– गजेंद्र पाटोळे, तहसीलदार, वसई