ठाणे : देशातील कुख्यात गुंड रवी पुजारी याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रवी पुजारी याच्याविरोधात २०१७ मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याने बांधकाम व्यवसायिकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याला बंगळुरू येथील कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक, सिनेमातील कलाकार, राजकीय नेते यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असे. त्यामुळे रवी पुजारी याचा फोन आल्यास अनेकांना घाम फुटत असे. परंतु ९० च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा बिमोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवी पुजारी देश सोडून पळून गेला होता. परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याच्या टोळी मार्फत सुरुच होत्या. ठाण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाला त्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागून धमकावले होते. तसेच टोळीच्या माध्यमातून गोळीबार देखील केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता.

दरम्यान, भारतीय तपास यंत्रणांनी २०१९ मध्ये आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारी याला अटक केली होती. त्यानंतर त्याला बंगळुरु येथे आणण्यात आले होते. तेथील कारागृहात तो शिक्षा भोगत होता. ठाण्यात रवी पुजारी विरोधात खंडणी आणि मोक्का अंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा मिळविला आहे. त्याला कासारवडवली येथील प्रकरणात अटक करण्यात आली असून २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.

रवी पुजारी कोण आहे?

रवी पुजारी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याची सर्वाधिक भिती सिनेमा क्षेत्रातील कलाकारांना होती. कलाकारांकडून खंडणी उकळणे आणि गँग चालविणे त्याचा मुख्य हेतू होता. ९० च्या दशकात एखाद्या कलाकाराला रवी पुजारी याचा फोन आल्यास कलाकारांचे हात पाय थरथरत असे. परदेशात राहून गुन्हे करत असल्याने त्याची ‘रेड काॅर्नर’ नोटीस काढण्यात आली होती.

रवी पुजारी सध्या कसा दिसतो?

ज्या रवी पुजारीच्या नावाने बांधकाम व्यवसायिक आणि कलाकार घाबरत होते. तो रवी पुजारी सध्या लठ्ठ झाला आहे. डोळ्यात भिती दिसत होती. पोलिसांनी त्याला न्यायालयात आणल्यानंतरही हा रवी पुजारी तोच का, असा प्रश्न अनेक वकिलांना पडला होता.