ठाणे – सोमवारी शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दक्षिणाच्या पद्धतीची लुंगी परिधान करून आल्याने त्यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. मात्र आता यावर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले असून, आदित्य ठाकरे यांनी ही लुंगी परिधान केल्याचा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. तर माझ्या गुडघ्याच्या व्याधीमुळे लुंगी परिधान करून यावे लागले असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

रवींद्र चव्हाणांनी फोटो शेअर करत आदित्य ठाकरेंना दिले ‘रिटर्न गिफ्ट’.

शिवसेना-भाजप महायुतीची सोमवारी शिवाजी पार्क येथे जाहीर सभा पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत मुंबई मध्ये महायुतीचा महापौर होणार असे ठामपणे सांगितलं, यामुळे ही सभा चांगलीच गाजली. मात्र या दोघांच्या भाषणापेक्षा सर्वाधिक चर्चा झाली ती भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दक्षिणात्य पेहेराव्याची. यावेळी रवींद्र चव्हाण हे दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी परिधान करून सभेला आले होते. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली होती.

मुंबईतील एका विशिष्ठ समाजाची मते मिळवण्यासाठी आणि काही लोकांना खुश करण्यासाठी असे केल्याचा आरोप आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्यावर केला होता. तर तामिळनाडूचे नेते अण्णामलई यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाची आणि त्यावरून झालेल्या वादाची रवींद्र चव्हाण यांच्या सोमवारच्या पेहरावसोबत जोडणी करण्यात आली. यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर चहूबाजूने जोरदार टीका करण्यात आली. याबाबत आता रवींद्र चव्हाण यांनी समाज माध्यमांवरून स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण ?

जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते

गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारदरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण… मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे… ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः ‘ हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत, म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन. राहिला प्रश्न टिकेचा…तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात… मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच…बाकी संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी… त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.. अशा आशयाची पोस्ट रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.