डोंबिवली : डोंबिवली पूर्व टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील जुन्या सुतिकागृह उभारणीच्या जागी परिसरातील नागरिकांचा विरोध असताना कल्याण डोंबिवली पालिकेकडून २५० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारणीचे काम हाती घेतले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी ठेकेदाराने खोल खड्डा खोदल्याने त्याचा ताण लगतच्या इमारतींच्या पायाचा मातीचा भराव आणि संरक्षक भिंतीवर आला. त्यामुळे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून, बाजुच्या संरक्षक भिंत आणि पायाच्या भरावाला धोका निर्माण झाला. या दोन्ही इमारतींची भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी रविवारी पाहणी केली.
दोन दिवसापूर्वी मुसळधार पावसात रात्रीच्या वेळेत कर्करोग रुग्णालय बांधकामालगतच्या मैत्री रुक्मिणी सदन इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, तर सायं विसावा इमारतीच्या संरक्षक भिंतीला तडे जाऊन या इमारतीच्या आधार खांबाचा भराव खचू लागला. या दोन्ही इमारतींमधील एकूण ५० रहिवाशांचे शहरातील हाॅटेलमध्ये कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केले आहे.
प्रदेशाध्यक्षांची पाहणी
रविवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक दीपेश म्हात्रे, शशिकांत कांबळे, मंदार हळबे, नगरसेविका खुशबु चौधरी, रंजना पेणकर, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, प्रकाश भोईर, जितेंद्र भोईर यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी पालिका अधिकारी, कर्करोग रुग्णालय कामाचे ठेकेदार उपस्थित होते. या इमारतींना धोका निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजनांची माहिती रुग्णालयाच्या सल्लागार, ठेकेदाराने प्रदेशाध्यांना दिली.
रुग्णालय नागरिक वस्तीत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जे काम करणार आहात ते अतिशय मजबूत करा. या भागात कोणत्याही प्रकारची वित्तीय हानी होणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही इमारतींमधील रहिवासी अन्य ठिकाणी राहत असल्याने या दोन्ही इमारतींच्या भागात २४ तास चक्राकार पध्दतीने पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांची गस्त राहील, जेणेकरून याठिकाणी कोणी चोरी किंवा अन्य काही प्रकार करण्यास येणार नाही, अशा सूचना चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
रहिवाशांशी संवाद
यावेळी मैत्री रुक्मिणी, सायं विसावा इमारतींमधील बाधित इमारतींमधील रहिवाशांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी संवाद साधला. याप्रकरणी योग्य ती भूमिका आणि सहकार्य करण्याची मागणी रहिवाशांनी केली. या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना आपल्या इमारतींमध्ये पुन्हा राहण्यास मिळेल अशा पध्दतीने खड्ड्या लगतच्या भागात मजबूत काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत. यात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे चव्हाण यांनी रहिवाशांना सांगितले.
मुसळधार पावसात घरदार सोडावे लागल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आम्ही एवढा खोल खड्डा खोदू नका असे सांगुनही आमचे कोणी ऐकले नाही त्यामुळे ही परिस्थिती ओढावली, अशी मते यावेळी काही रहिवाशांनी व्यक्त केली.
संतप्त सूर
कर्करोग रुग्णालय डोंबिवलीतच सुतिकागृहाच्या जागी झाले पाहिजे म्हणून हेका धरून आपलेच म्हणणे मान्य करणारा एक विकासपुरूष लोकप्रतिनिधी दोन दिवसांपासून आपली साधी चौकशी करण्यासाठी फिरकला नाही म्हणून या भागातील रहिवाशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. इतरवेळी काही असले की सतत ताफा घेऊन कल्याण, डोंबिवलीचा दौरा करणारा हा लोकप्रतिनिधी कुठे गेला, असे संतप्त प्रश्न डोंबिवलीतील नागरिक उपस्थित करत आहेत.
राज्यात आणि देशाच्या विविध भागात दौरे करण्यास वेळ आहे. मग आमच्यावर आपत्ती ओढावली असताना तुम्हाला आमच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का. मते मागताना आमच्या दारात फेऱ्या मारल्या आणि आता वेळ आली तेव्हा गायब होता, अशा तिखट भावना काही नागरिकांनी व्यक्त केल्या.
फोटो ओळ
कर्करोग रुग्णालयालगतच्या खचलेल्या भागाची पाहणी करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.
