विधान परिषदेच्या ठाणे आणि पालघर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हे कोटय़धीश आहेत. प्रथम वर्ष कला शाखेतून उत्तीर्ण असलेले शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांची संपत्ती १०८ कोटींच्या घरात असून सलग २४ वर्षे या मतदारसंघातून विजयाचे डाव खरे करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरेंची संपत्ती १६ कोटी रुपये इतकी आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती हाती आली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकींना सामोरे जाणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे भरले आहे. या अर्जासोबत भरण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या संपत्ती, शिक्षण आणि गुन्ह्य़ांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. वसंत डावखरे यांनी १९७१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर रवींद्र फाटक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्रथम वर्ष कला शाखा उत्तीर्ण आहेत. डावखरे यांनी मासिक वेतन हे उत्पन्नाचे साधन दर्शवले आहे. तर फाटक यांनी बांधकाम व्यवसायाचा उल्लेख केला आहे. रवींद्र फाटक यांची एकूण संपत्ती १०८ कोटी २९ लाख ३९ हजार ५५३ आहे तर त्यांची देणी ६२ कोटी ४९ लाख १७ हजार ३५६ इतकी आहेत. वसंत डावखरे यांची एकूण संपत्ती १६ कोटी ९३ लाख ५४ हजार ५६८ इतकी असून त्यांची देणी ४ कोटी ८ लाख ३८ हजार ८७६ इतकी आहे. डावखरे यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही. तर फाटक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगल करणे, प्राणघातक हल्ला, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, शांतता भंग करणे, फसवणूक, निवडणुकीच्या दरम्यान गैरप्रकार, पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन, स्फोटक पदार्थाच्या बाबतीत हयगयीचे वर्तन, वातावरणाच्या आरोग्यास धोका पोहोचवण्याचे गुन्हे फाटक यांच्या विरुद्ध दाखल आहे. रवींद्र फाटक यांच्याकडे हुंडाई गेट्झ, मर्सिडीझ आणि इनोव्हा अशी वाहने आहेत. तर डावखरे यांच्या नावे कोणत्याही प्रकारच्या वाहनांची नोंद नाही. शिवाय या दोन्ही उमेदवारांकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र उपलब्ध नाही.

वार्षिक उत्पन्न..
रवींद्र फाटक यांचे वार्षिक उत्पन्न ८२ लाख ८१ हजार ७९० रुपये तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न २९ लाख ९८ हजार २०० रुपये इतके आहे. तर वसंत डावखरे यांचे वार्षिक उत्पन्न ३१ लाख ६४ हजार ४९० रुपये तर त्यांच्या पत्नीचे १ लाख ७५ हजार इतकी आहे.

फाटक – डावखरे यांची कोटय़वधींची मालमत्ता
रवींद्र फाटक : १०८ कोटी
जंगम मालमत्ता : ४३ कोटी ४ लाख ७७ हजार २९६
स्थावर मालमत्ता : ४२ कोटी १४ लाख ४६ हजार ६३७
पत्नी – जयश्री फाटक :
जंगम मालमत्ता : ४ कोटी २२ लाख ५५ हजार ३३३
स्थावर मालमत्ता : १८ कोटी ३७ लाख ७५ हजार ५७३
मुलगा – प्रणय : २२ लाख ९१ हजार ६४६
मुलगा प्रियांश :
२६ लाख ९३ हजार ६८
वसंत डावखरे : १६ कोटी
जंगम मालमत्ता : ७ कोटी ३५ लाख ८१ हजार ३६३
स्थावर मालमत्ता : ९ कोटी ३१ लाख ७२ हजार ९३१
पत्नी – शकुंतला डावखरे :
स्थावर मालमत्ता :
२६ लाख २७४