कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एका कुटुंबातील तीन जणांचा, म्हणजेच बहीण-भावांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनांची धडक इतकी भीषण होती की वाहनातील सर्व ११ जण जागीच ठार झाले. अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

रायते गावाजवळ उल्हास नदीवरील पुलावर प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की व्हॅनमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या व्हॅनमधून एकूण ११ प्रवासी प्रवास करत होते. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटली असून सहा पुरुष तीन महिला आहे. तर उर्वरित २ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यामध्ये सर्व मृतदेह गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. तर ओळख पटलेल्या मृत नागरिकांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला असून गोवेली रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईक जमण्यास सुरु झाले आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. हे तिघे जण १७ ते २२ या वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली आहेत.

११ पैकी ९ मृत व्यक्तींची ओळख पटविण्यात आलेले असून त्यांचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे.

१. प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने,पुरुष,वय 21 वर्ष, देवगाव मुरबाड
२. भूषण घोरपडे, पुरुष,वय 49 वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक.
३. जिजा गोविंदा केंबारी, महिला,वय 50 वर्ष, टेंभरे मुरबाड
४. अनंता पवार, पुरुष,साखरे मुरबाड
५. दीपक गवळी, पुरुष,राहणार कल्याण<br>६. गणपत जैनू मधे,पुरुष, वय 32 वर्ष, देवराळवाडी मुरबाड
७. स्नेहा मोहपे, महिला,वय अंदाजे 22 वर्ष, नारायणगाव मुरबाड
८. मानसी मोहपे,महिला, वय अंदाजे 20 वर्ष, नारायणगाव मुरबाड
९. प्रथमेश मोहपे, पुरुष,वय अंदाजे 17 वर्ष, नारायणगाव मुरबाड.

  • अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे.