करोना काळानंतर भरलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा प्रतिसाद

आरोग्यवर्धक, योग, व्यायाम, शेअरबाजार या विषयांवर आधारित पुस्तकांनाच अधिक मागणी

आरोग्यवर्धक, योग, व्यायाम, शेअरबाजार या विषयांवर आधारित पुस्तकांनाच अधिक मागणी

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : ठाण्यातील ‘साहित्ययात्रा’तर्फे भरलेल्या पुस्तक प्रदर्शनाला ठाणेकर वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. करोनाच्या काळात वाचनाची भूक ई-पुस्तकांतूनच भागवावी लागल्यानंतर आता ठाणेकर वाचक पुन्हा छापील पुस्तकांच्या खरेदीकडे वळल्याचे प्रदर्शनाला मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या प्रदर्शनात वाचकांचा जास्त कल हा आरोग्यवर्धक, योगा, व्यायाम, शेअर बाजार या विषयांवर आधारित पुस्तके खरेदी करण्याकडे जास्त असल्याचे पाहायला मिळाले.

करोनामुळे गेले दीड वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथालये तसेच पुस्तक प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या कालावधीत वाचनामध्ये खंड पडू नये यासाठी काही ग्रंथालय व्यवस्थापकांनी वाचकांना घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली, तर अनेक वाचकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून पुस्तके खरेदी केली. यावेळी अनेकदा वाचकांना त्यांना पाहिजे ते पुस्तक मिळण्यास अडथळा निर्माण होत होता.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुस्तक प्रदर्शन भरवण्यास परवानगी मिळाली असल्याने ‘साहित्ययात्रा’च्या वतीने पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात काही प्रमाणात इंग्रजी पुस्तकांचाही समावेश आहे. कथा, कादंबरी, कविता, ललित लेख, आत्मचरित्र, धार्मिक, विज्ञानविषयक, ऐतिहासिक, प्रवासवर्णन अशी विविध प्रकारची पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. करोना काळात प्रत्येकालाच आरोग्याचे तसेच व्यायामाचे महत्त्व समजले. त्यामुळे यंदा प्रदर्शनात ३० ते ३५ टक्के आरोग्यवर्धक तसेच योग, व्यायाम यांवर आधारित पुस्तकांची मागणी वाढली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या प्रदर्शनाला दररोज २०० ते २५० वाचक भेट देत आहेत, असे साहित्ययात्राचे शैलेश वाझा यांनी सांगितले.

शेअर बाजारावर आधारित पुस्तकांकडे कल

शेअर बाजराच्या निर्देशांकात दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता मराठी वाचकांचा कलही अलीकडे शेअर बाजारावर आधारित पुस्तकांच्या खरेदीकडे अधिक दिसू लागल्याचे निरीक्षण ठाण्यातील पुस्तक प्रदर्शन आयोजकांनी व्यक्त केले. इनव्हेस्टमेंट प्लॅिनग, शेअर बाजाराची संपूर्ण ओळख, मार्केट मेकर्स, म्युच्युअल फंडाची ओळख, फ्लर्टिग विथ स्टॉक्स अशा पुस्तकांची वाचकांकडून खरेदी होत आहे. यंदा शेअर बाजारावर आधारित पुस्तकांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या पुस्तक प्रदर्शनामुळे वाचकांना वाचनासाठी पुस्तके मिळणे सोपे झाले आहे. ठाण्यात करोना काळानंतर प्रथमच मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व व्यक्तींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विनायक गोखले, कार्याध्यक्ष, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers huge respond to book exhibition organized after the corona period zws

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या