ज्येष्ठांच्या औषधांचाही विचार व्हावा
– ‘ठाण्यातील औषधांच्या दुकानामध्ये सवलतीच्या दरात औषधे’ ही बातमी वाचली. हा चांगला उपक्रम आहे; परंतु मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावरील गोळ्या-औषधांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार होणाऱ्या त्रासांवरील औषधांचाही यात समावेश असावा. अनेक वृद्ध घरी स्नानगृहात किंवा रस्त्यात चालताना अचानक पडतात. त्यामुळे त्यांच्या पायाची तसेच कमरेची हाडे मोडण्याचे प्रकार घडतात. डॉक्टर त्यावर उपाय म्हणून काही महागडी औषधे देतात, मात्र ती सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी नसतात. या गोळ्यांची पाकिटे अडीचशे ते तीनशे रुपयांच्या आसपास असतात. अर्थात या गोळ्या वारंवार घ्याव्या लागत असल्याने बराच खर्च होतो. त्यामुळे ‘क्युमॅप’ने अशा गोळ्यांच्या किमतीचा आढावा घेऊन त्या सवलतीच्या दरात विकल्यास अनेकांना मोठी मदत होईल.
 मुकुंद केळकर, घंटाळी, ठाणे

वसुंधरा सुफलाम् होईल
ठाणे महानगरपालिकेने ठेकेदारांना कंत्राटाची बिले हवी असल्यास त्या बदल्यात रोपे देण्याची अत्यंत महत्त्वाची अट घातली आहे. ही अट खरोखरच स्तुत्य आहे. त्यामुळे पालिकेकडे अशी विविध प्रकारची रोपे जमा होतीलच, पण प्रत्येक महापालिका आणि नगरपालिकांनी हा उपक्रम आपापल्या पातळीवर राबवल्यास शहरीकरणामुळे वृक्षतोडीचा अटळ परिणाम रोखता येईल. शहरांमध्ये झाडांची संख्या वाढेल. भावी पिढय़ांचे भवितव्य सुरक्षित राहील; परंतु हा केवळ ठाणे महापालिकेचाच उपक्रम राहू नये.
– तो राज्यपातळीवर राबवण्यासाठी सरकारनेही तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. ठेकेदारांना त्यांचे बिलाचे पैसे मिळतीलच, पण या पृथ्वीला प्राण पुरवणारी असंख्य झाडे मिळतील. ही धरणी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.
सुभाष खटावकर, पाथर्ली

– भ्रष्टाचारी ‘लाचलुचपत’
– ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक दीक्षित यांच्या प्रयत्नांनी कारवायांना तर चालना मिळाली, पण त्यांच्या स्वत:च्या विविध विभागांमध्ये कोणत्या पद्धतीने कार्यवाही पुढे सरकते याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या ठिकाणी जे लाचखोर सापडतात ते खूप पैसेवाले असतात. हल्लीच्या काही घटनांवरून हे स्पष्टच होत आहे. याचाच फायदा घेत ठाणे व नवी मुंबई एसीबी विभाग त्यांच्या तपासाच्या कामात त्रुटी ठेवण्यासाठी, चार्जशीट उशिरा दाखल करत आहेत.
रवींद्र ठाकूर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य, ठाणे