लोकमानस: अतिधोकादायक इमारती रिक्त करणे गरजेचे

ठाणे, मुंब्रा, वसई, विरार, कल्याण व डोंबिवली शहरातील सर्वेक्षणात मोठय़ा संख्येने अतिधोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. या अतिधोकादायक इमारती पावसापूर्वी रिकाम्या करण्याची आवश्यकता आहे.

अतिधोकादायक इमारती रिक्त करणे गरजेचे
ठाणे, मुंब्रा, वसई, विरार, कल्याण व डोंबिवली शहरातील सर्वेक्षणात मोठय़ा संख्येने अतिधोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. या अतिधोकादायक इमारती पावसापूर्वी रिकाम्या करण्याची आवश्यकता आहे. अतिधोकादायक इमारतीत राहणार रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास तयार नसल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. मृत्येचे सापळे ठरण्याची वेळ आलेल्या अतिधोकादायक इमारती स्वत:हून रिकाम्या करून तेथील नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करायला हवे. धोकादायक इमारतींच्या पडझडींमुळे होणाऱ्या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्यास पालिकेला उत्तर द्यावे लागते. या परिस्थितीतही संबंधित इमारतीतील रहिवासी इमारत रिकामी करत नसल्यास त्यांच्या घरातील वीज,पाणी अशा जीवनावश्यक गोष्टी खंडित करणे व पोलिस बंदोबस्तात रहिवाशांचे सामान बाहेर काढून धोकादायक इमारतींवर कारवाई करणे हे पालिका प्रशासनाचे काम ठरते.
विवेक तवटे, कळवा

रस्ता पालिकेने केला
गेल्या आठवडय़ात सदाशिव टेटलिकर यांनी (भूतकाळाचे वर्तमान) त्यांच्या लेखात ठाण्यातील चौकांची खूपच छान माहिती दिली आहे. मात्र अशोक स्तंभ चौकाचे उद्घाटन माझ्या माहितीप्रमाणे राजेंद्र प्रसाद यांनी केले. त्याचभेटीत त्यांनी कळव्यातील नॅशनन मशिनरी या कंपनीचेही उद्घाटन केले. त्याचप्रमाणे शिवाजी पथ श्रमदानाने नव्हे तर पालिकेने केला. या रस्ताबाबतचा ठराव बराच आधी झाला होता. मात्र जुन्या बाजारपेठेतील दुकानदारांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. अखेर १९५४-५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पालिका बरखास्त झाली. त्यावेळी प्रशासक म्हणून आलेल्या देसाई नामक अधिकाऱ्याने हा रस्ता केला. त्यावेळी तलावात हायसिंग नावाची वनस्पती होती, ती मात्र श्रमदानाने काढली. त्यावेळी पालिकेने पायास कंड लागू नये म्हणून विशिष्ट तेलाची व्यवस्था केली होती.
काही आरंभशूर निघून गेल्यावर हनुमान व्यायामशाळेचे पदाधिकारी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे काम पूर्ण केले. या समारंभाच्या समारोपास सेनापती बापट आले होते. मी त्या श्रमदानात सहभागी झालो होतो.
वसंत मोडक, ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response on loksatta news