ऑन दि स्पॉट : बेकायदा चायनीज गाडय़ांवर कारवाई

शहरातील बेकायदा चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडय़ांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे.

ठाणे महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील बेकायदा चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडय़ांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. याविषयी वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया-

उपाहारगृहांचे काय?
महाविद्यालयांच्या उपाहारगृहांमध्ये चायनीज पदार्थाना पसंती दिली जाते. बनावट सॉस, शिळ्या कोंबडय़ांचा वापर होत असल्याने अशा गाडय़ांबरोबर शाळा-महाविद्यालयांच्या उपाहारगृहांवरही अन्न व औषध प्रशासनानेकारवाई करावी.
-नंदकुमार जामदार, ठाणे

भविष्य धोक्यात..
चायनीज गाडय़ांवरील चायनीजचा रंग अतिशय भडक लाल असतो. त्यामुळे अतिरंगाच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय या पदार्थामध्ये अजिनोमोटोचा वापर अधिक केलेला असतो. त्यामुळे या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
-मंगेश तिरोडकर, ठाणे

निर्णयाचे स्वागतच आहे..
चायनीज गाडय़ा बंद केल्या हे खरे तर चांगलेच केले. या गाडय़ांवर विकल्या जाणाऱ्या पदार्थामुळे अनेक रोग उद्भवतात. तसेच या गाडय़ा बेकायदेशीररीत्या कुठेही उभ्या राहिल्याने शहरात वाहतूक कोंडी होते. या निर्णयांचे स्वागतच करायला हवेच.
-निवेदिता लोमटे, ठाणे

कारवाई नको, बंदी आणा..
आरोग्याची समस्या लक्षात घेता महापालिकेने घेतलेले निर्णय योग्यच आहे. चायनीज गाडीवर जे खाद्यपदार्थ बनविले जातात त्या पदार्थामध्ये टाकलेले जिन्नसही फार निकृष्ट दर्जाचे असतात. त्यामुळे केवळ कारवाई करून शांत न बसता या पदार्थावर बंदी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
-अक्षय देशपांडे, ठाणे

परवाने रद्द करा..
चायनीज पदार्थामुळे अनेक जणांना आजाराला बळी पडावे लागले. असे पदार्थ विक्री करून सर्वसामान्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांचे खाद्य परवाने रद्द करायला हवेत. अन्न व औषध प्रशासनाने खाद्य परवाने देताना त्यामध्ये अशा प्रकारचे मानवी शरीराला घातक अशा पदार्थावर बंदी घालावी.
-प्रतीक चव्हाण, ठाणे

बाराही महिने कारवाई होणे आवश्यक
शरीराला पोषक नसणाऱ्या पदार्थाचे आक्रमण आपल्या जीवनशैलीवर होत आहे. आपल्याला दीर्घायुषी व्हायचे असेल तर अशा पदार्थावर बंदी आणायला हवी. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा पदार्थावर आळा घालायचे मनापासून ठरविले तरच ते शक्य होऊ शकते. घरगुती पौष्टिक पदार्थाचा आपण व्यावसायिक दृष्टीने विचार करायला हवा.
– संभाजी भोसले, ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Readers view on action against illegal chinese food stalls