scorecardresearch

ठाणे वाचन मंदिर नव्या रूपात

ठाण्यातील १७२ वर्षे जुने आणि पहिले वाचनालय म्हणून ठाणे वाचन मंदिर ओळखले जाते.

वातानुकूलित अभ्यासिकेसह अन्य सुविधा

आकांक्षा मोहिते

ठाणे : करोनाकाळात ओस पडलेल्या अभ्यासिकांकडे पुन्हा एकदा वाचकांची आणि अभ्यासकांची पावले वळावीत यासाठी ठाणे वाचन मंदिर या शहरातील जुन्या आणि प्रसिद्ध अशा संस्थेने जोमाने प्रयत्न सुरू केले असून अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नूतनीकरण झालेली या संस्थेची अभ्यासिका ठाणेकरांचे आकर्षण ठरू लागली आहे.

 ठाण्यातील १७२ वर्षे जुने आणि पहिले वाचनालय म्हणून ठाणे वाचन मंदिर ओळखले जाते. या वाचनालयात कथा, कादंबरी, ललित, चरित्र, प्राचीन संदर्भ गंथ अशा विविध प्रकाराचे साहित्यांची जवळपास ५० हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटांतील वाचक या ठिकाणी भेट देत असतात. करोनाकाळात अन्य क्षेत्रांबरोबरच वाचनसंस्कृती जोपसणाऱ्या संस्थांमध्येही उपस्थिती रोडावली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक वाचकांनी या ठिकाणी येण्यास पाठ फिरवली. त्यामुळे व्यवस्थापनाला मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागले.

करोनाकाळानंतर पुन्हा एकदा वाचकांची पावले संस्थेच्या मार्गाने वळावीत त्याचबरोबर तरुणाईचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी ठाणे वाचन मंदिराकडून विविध प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाणे वाचन मंदिराचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमच वातानुकूलित अभ्यासिका उभारण्यात आली असून यामध्ये जवळपास ६५ विद्यार्थ्यांची आसन क्षमता केली आहे. या अभ्यासिकेचे वैशिष्टय़े म्हणजे विद्यार्थाना बसण्यासाठी आरामदायी टेबल आणि खुर्च्याची व्यवस्था, स्वतंत्र कप्पे, लॅपटॉप, मोबाइल चार्जिगसाठी सुविधा, इंटरनेटची सोय, अभ्यास करताना लक्ष विचलित होऊ नये यासाठी ध्वनिरोधक बांधणी, अभ्यासाविषयी तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी किंवा जेवणासाठी स्वतंत्र एक कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह या अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सर्व पोषक सुविधांमुळे विद्यार्थाचादेखील या अभ्यासिकेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या नवीन वातानुकूलित अभ्यासिकेचे सभासद होण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत सवलत देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आणि  शिक्षणतज्ज्ञ केदार जोशी यांनी केले आहे.

ठाणे नगर वाचन मंदिराचे नूतनीकरण हा तरुणाईला वाचनालयाकडे आकर्षित करण्याचा एक अत्यंत प्रमुख टप्पा असून नजीकच्या काळात अभ्यासिका बाल विभाग सभासदत्व व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून वर्षांला साधारण २५ वयोगटांपेक्षा कमी वयाचे दोन हजार तरुण वाचनलायाकडे आकर्षित करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.

– केदार जोशी, अध्यक्ष, ठाणे वाचन मंदिर

ठाणे वाचन मंदिराची रचना

ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून करोनाकाळात पहिल्या मजल्यावर वाचनालय स्थलांतरित केले होते. त्यानंतर आता त्याचे नुकतेच नूतनीकरण केले असून दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभारण्यात आलेली वातानुकूलित अभ्यासिका तर तिसऱ्या मजल्यावर विनावातानुकूलित अभ्यासिका आहे.

१,६५० सभासद संख्या

ठाणे वाचन मंदिरात एक पुस्तक सभासदत्व, दोन पुस्तक सभासदत्व, आजीव, आश्रयदाते, अभ्यासिका आणि बालविभाग अशा सर्व सभासदत्वांपैकी सद्य:स्थितीला एकूण १,६५० सभासद संख्या आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reading temple new form facilities airconditioned studyysh

ताज्या बातम्या