तयार कपडे, कापड बाजारात तेजी

दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला हव्या त्या प्रकारचे कापड खरेदी करून हव्या त्या पद्धतीने कपडे शिवून घेण्याकडे अनेकांचा कल असतो.

|| पूर्वा साडविलकर

शिलाई कारागिरांकडे १५ दिवस आधीच नोंदणी

ठाणे: करोनामुळे गतवर्षी दिवाळीतही कापड वा तयार कपडे खरेदी करणे टाळणाऱ्या ग्राहकांनी यंदा मात्र, महिनाभर आधीपासूनच दिवाळीची खरेदी केली असून तयार कपडे आणि कापड बाजारात  तेजी दिसत आहे.  एवढेच नव्हे तर, कपडे शिलाई करणाऱ्या व्यावसायिकांकडेही १५ दिवस आधीच नोंदणी पूर्ण झाली असून आता शिलाईसाठी जाणाऱ्यांना नकार मिळू लागला आहे.

मोठमोठ्या मॉलमधील तसेच बाजारपेठांतील कपड्यांच्या दुकानांमध्ये दसऱ्यापासूनच खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळी तोंडावर येऊ लागल्याने ही गर्दी अधिकच वाढू लागली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला हव्या त्या प्रकारचे कापड खरेदी करून हव्या त्या पद्धतीने कपडे शिवून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे यंदा अनेक ग्राहकांनी १५ दिवस आधीच शिलाई दुकाने गाठून कपडे शिवण्यासाठी दिल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आता अशी परिस्थिती आहे की, सध्या कपडे शिवून देण्यासाठी कारागीर मिळेनासे झाले आहेत.  धागे तसेच अन्य शिलाई साहित्याच्या दरांत वाढ झाल्याने शिलाईच्या दरांत २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के महिलांची मागणी ही कपडे शिवून घेण्याकडे असल्याचे शिलाई काम करणाऱ्या महिलांनी सांगितले. 

‘धनत्रोयदशी ते लक्ष्मीपूजनापर्यंतच्या आगाऊ नोंदणी आमच्याकडे आल्या आहेत. अजूनही या नोंदणी येत आहेत. आधीच्याच नोंदणी मोठ्या प्रमाणात आता येत असल्याने ग्राहकांनी दिवाळीनंतरची तारीख दिली जात आहे. अनेकांना ते शक्य नसल्यामुळे त्या नोंदणी आम्हाला रद्द कराव्या लागत आहेत,’ असे ठाण्यातील पिंकी साहू या शिलाई व्यावसायिकांनी सांगितले. ‘गतवर्षी करोनामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बसला होता. मात्र यंदा ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. महिलावर्गाकडून पारंपरिक साड्यांसह कांजीवरम आणि बनारसी साड्यांवर सिल्कच्या आकर्षक झरीमुळे या साड्यांना विशेष मागणी आहे,’ असे ‘कलानिधी’चे मालक अमित कारिआ यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readymade garments textile market boom registration artisans 15 days in advance akp

ताज्या बातम्या