ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या वाढीव आकृतीबंधाच्या आराखड्यास नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार मंजुर करण्यात आलेल्या ८८० पदांमध्ये ८७८ पदे आरोग्य विभागाची असल्याची बाब समोर आली आहे. यातील ‌उर्वरित दोन पदे उपायुक्त पदाची आहेत. यामुळे वाढीव आकृतीबंधमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व असल्याचं दिसून येतं आहे. तर, इतर विभागांवर अन्याय झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात चर्चीली जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २०१२ च्या जनणगणेनुसार १८ लाख ४१ हजार इतकी लोकसंख्या आहे. करोना संकटामुळे २०२१ मध्ये जणगणना करण्यात आलेली नाही. असे असले तरी गेल्या दहा वर्षात महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महापालिकेच्या ताफ्यात सध्या ९८०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या मानाने पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. शहराची लोकसंख्या वाढत असली तरी त्या तुलनेत पालिका अधिकारी आणि कर्मचारी संख्येत वाढ झालेली नव्हती. यामुळे शहरात नागरी सुविधा पुरविताना पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत होता.

तसेच सद्यस्थिती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ८८० पदांच्या निमिर्तीसाठी वाढीव आकृतीबंध आराखडा तयार केला होता. त्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याने पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंजुर झालेल्या ८८० पदांमध्ये ८७८ पदे आरोग्य विभागाची तर दोन पदे उपायुक्त पदाची आहेत. करोना काळात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पालिकेला कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागली होती. या काळात गेले अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य विभागाचे महत्त्व पालिका प्रशासनाला समजले होते. यातूनच पालिकेने आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पाऊले उचलल्याचे आकृतीबंधमधून दिसून येत आहे.

संबंधित मंजुर झालेल्या पदांमध्ये उपायुक्त, आरोग्य विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, उपवैद्यकीय अधिक्षक, इन्टेसिव्हिस्ट, वैद्यकीय सुक्षमजीवशास्त्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, शल्य चिकीत्सक, फिजीशयन, भुलतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकीत्सक, वैद्यकीय अधिकारी, दंत वैद्यकीय अधिकारी, सिनीयर वैज्ञानिक रिसर्च अधिकारी, ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी, डेमॉन्स्ट्रेटर, वैद्यकीय अधिकारी (आयुष), क्लिनिक इन्स्ट्रक्टर, सीनियर केमीस्ट, ज्युनीयर वैज्ञानिक रिसर्च अधिकारी, आरोग्य शिक्षक, सहायक मेट्रन यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे.