डोंबिवली – डोंबिवली जवळील ठाकुर्ली चोळेतील रील स्टार आणि विकासक, सराईत गुन्हेगार बुहचर्चित सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याच्या दावडीतील घरात सापडलेल्या नोटा आणि घातक शस्त्र साठ्याची एकूण किंमत १२ लाख २१ हजार असल्याचे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले. ही घातक शस्त्रे त्याने विक्रीसाठी आणली होती. सुरेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत, असे त्यांनी सांगितले.
ठाकुर्ली चोळे गाव हद्दीत राहणारा सराईत गु्न्हेगार हा मागील तीन ते चार वर्षापासून रील स्टार म्हणून आणि त्यानंतर त्याच्या विविध प्रकारच्या कारनाम्यांनी प्रसिध्दीला आला आहे.
१३ गुन्हे दाखल
सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. यामधील १२ गुन्हे डोंबिवलीतील मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या अभिलेखावर सराईत गुन्हेगार म्हणून सुरेंद्रची नोंद करण्यात आली आहे.
दावडीतील घरात शस्त्रे
सुरेंद्रच्या अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता आहेत. तो मूळचा ठाकुर्ली चोळे गावातील रहिवासी आहे. त्याचा डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील दावडी गावात मोती मिठाईवाला दुकानाच्या पाठीमागे श्री धनलक्ष्मी इमारत भागात एकविरा नावाने बंगला आहे. या बंगल्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शस्त्रसाठा मिळाला आहे. या शस्त्रांमध्ये तीन देशी बनावटीचे पिस्तूल, १ सिक्सर रिव्हाॅल्व्हर, सात गावठी कट्टे, एक मॅगझिन, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, १६७ जिवंत छरे, २ धारदार लोखंडी तलवार, ३ लोखंडी कोयते, १ लोखंडी लांब सुरा, एक बटन चाकू, २ लोखंडी सळया अशी घातक शस्त्रे सुरेंद्रने विक्रीसाठी जवळ बाळगली होती, असे पोलिसांनी सांगितले. हा सर्व शस्त्रसाठा त्याने घरातील चपला ठेवण्याच्या कप्प्यात कोणाला संशय येऊ नये अशा पध्दतीने ठेवली होती. याशिवाय तीन लाख ५२ हजार रूपयांची रक्कम त्याच्या घरात आढळून आली. हा सर्व साठा पोलिसांनी जप्त करून सुरेंद्रला अटक केली आहे.
बाहेर येताच कारवाया
सुरेंद्र एका गुन्ह्यात अटकेत होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाला सुरेंद्रच्या दावडीतील घरात शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने दोन दिवसापूर्वी त्याच्या बंगल्यात छापा मारून हा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत आहे.
कारवाई पथक
साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, बोरकर, हवालदार विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, सचिन कदम, विलास कडू, गुरूनाथ जरग, दीपक महाजन, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, मंगल गावित, गोरक्ष रोकडे, जालिंदर साळुंखे, प्रवीण किनरे, प्रशांत वानखेडे यांच्या पथकाने केली.
