खाऊखुशाल : चवीचे पाश्चिमात्य ढंग

चिज, मेयो आणि सॉस वापरून तयार केलेले बर्गरही येथे चवीने खाल्ले जातात.

डोंबिवलीतील सुप्रसिध्द फडके मार्ग खाबुगिरिसाठी प्रसिध्द आहे. इथे भारतीय पदार्थाप्रमाणेच पाश्चिमात्य पदार्थही तितक्याच आवडीने खाल्ले जातात. खव्वयेगिरीला वयोमर्यादा नसते हे या खाऊगल्लीत फेरफटका मारल्यावर लगेच समजते. मुलांप्रमाणे पालकही पिझ्झा, बर्गर, फ्रँकीवर आवडीने ताव मारतात. ‘रिफ्रेश कट्टा’ या दुकानात या पाश्चिमात्य पदार्थामध्येच आणखी पर्याय उपलब्ध आहेत. शाकाहरी हॉट डॉग आणि १८ प्रकारच्या फ्रँकी ही या दुकानाची खासियत. चिज, मेयो आणि सॉस वापरून तयार केलेले बर्गरही येथे चवीने खाल्ले जातात.

पिझ्झा, बर्गर असे पदार्थ आजकाल लोकांच्या इतके पसंतीस उतरले आहेत की अनेक घरांमध्ये कधीतरी संध्याकाळी जेवणाऐवजी हे पाश्चिमात्य पदार्थ खाल्ले जातात. तरुण पिढीबरोबरच घरातील वडीलधारी मंडळीही आता कधीतरी पिझ्झाची चव चाखू लागले आहेत. पूर्वी पाश्चिमात्य पदार्थ अभावानेच मिळायचे. आता शहरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये फास्ट फूडची दुकाने दिसू लागली आहेत. प्रत्येक नाक्यावर उभे राहून कधी तरुणाई तसेच आपल्या मुलांना फिरायला घेऊन आलेले पालक उभे राहून फॅ्रन्की, पिझ्झा खाताना दिसतात. डोंबिवलीतील प्रसिद्ध फडके मार्गावर सण उत्सवाखेरीज एरव्हीसुद्धा तरुणाईची रेलचेल असते. फडके मार्गावर असलेले गणपती मंदिर आणि येथे असलेल्या निरनिराळ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी सतत लोकांची वर्दळ असते. सतत लोकांचा राबता असल्याने इथे खाण्याची वेगवेगळी दुकाने उघडली आहेत. विविध उपवासाचे पदार्थ, मिसळ, वडापाव, समोसा, भेळ अशा अनेक पदार्थाची चव डोंबिवलीकरांना येथे चाखता येते. अशाच अनेक दुकांनांपैकी एक म्हणजे रिफ्रेश कट्टा. हॉट डॉग, फ्रॅन्की, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ म्हणजे या दुकानांची खासियत. दिवसभरात या दुकानात साधारण १०० ते १२० फ्रॅन्कींचा खप होतो. अगदी लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वाचीच या दुकानात ये-जा असते. येथे मिळणारे हॉट डॉग हे या दुकानाची खासियत. लांब पावामध्ये सॉसेज घालून तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थाला तरुणांची चांगलीच पसंती मिळाली आहे. हॉट डॉग म्हणजे पाश्चिमात्य देशातील वडापाव. मूळचा मासांहारी असणाऱ्या या पदार्थामध्ये सर्वाचा लोकप्रिय बटाटा घालून शाकाहारी हॉट डॉग ‘रीफ्रेश कट्टय़ा’मध्ये तयार केले जाते. या दुकानात एकूण १८ प्रकारच्या फ्रॅन्की मिळतात. या प्रकारांमधील सलाड फॅ्रन्की, चिज मेयो फॅ्र न्की यांना खवय्यांकडून अधिक मागणी आहे.

येथे मिळणारे विविध प्रकारचे बर्गर आणि पिझ्झासुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. पनीर पिझ्झा, ऑलिव्ह पिझ्झा, चिझ पिझ्झा या प्रकारांना सर्वाधिक मागणी असते. फ्रॅन्कीची सुरुवात साधारण २० ते २५ रुपयांपासून होते. ६०-७० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या फॅ्रन्की या दुकानात मिळतात. खिशाला परवडणाऱ्या आणि पोट भरणाऱ्या या पदार्थामुळे येथे येणारे ग्राहक पुन्हा पुन्हा येथे येतात, असे दुकानाचे मालक सांगतात. येथे पिझ्झा ४ इंच आणि ९ इंच अशा दोन आकारांत मिळतो. सर्व प्रकारचे पिझ्झा अशा स्वरूपात मिळतात. त्यानुसार त्यांच्या किमती आहेत. ५० ते १०० रुपयांपर्यंत पिझ्झा मिळतो.

पोट भरल्यानंतर लागलेली तहान भागवण्यासाठी इतर उपाहारगृहांप्रमाणे शीतपेयसुद्धा आपल्याला या दुकानात मिळतात. रीफ्रेश कट्टय़ावर मिळणाऱ्या सर्वच पदार्थाची सामग्री ही ताजी आणि दररोज तयार केली जाते. सर्वच पदार्थामध्ये जाणारा शेजवान सॉस, हॉट डॉगसाठी वापरले जाणारे विविध सॉस हे किलो किलोच्या हिशोबाने तयार केले जातात. दुकानात मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये जाणारे चीज, बटरसुद्धा उत्तम दर्जाचे असते, असे दुकानाचे मालक प्रथमेश क्षीरसागर यांनी सांगितले. दुकानामध्ये बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था आहे. ऑर्डर दिली की काही वेळेत ताजे, गरमागरम पदार्थ दिले जातात. त्यामुळे खवैय्ये तृप्तीचा ढेकर देत समाधानाने घरी जातात. आठवडय़ाच्या सातही दिवस हे दुकान सुरू असते. गेल्या साडेसहा वर्षांत प्रथमेश क्षीरसागर यांनी अतिशय मेहनतीने रिफ्रेश कट्टय़ाची कीर्ती वाढवली आहे.

रीफ्रेश कट्टा

  • कुठे?- अप्पा दातार चौक, फडके मार्ग, डोंबिवली (पू.)
  • कधी?- दुपारी १२ ते रात्री १०.३०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Refresh katta dombivli fast food

ताज्या बातम्या