‘व्हॅलेंटाइन्स’च्या दिवशी नोंदणीकृत विवाह यंदा अशक्य

एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून फेब्रुवारी महिन्याकडे पाहिले जाते.

संग्रहित छायाचित्र

|| पूर्वा साडविलकर

रविवार असल्याने विवाह नोंदणी कार्यालयाला सुट्टी

ठाणे : १४ फेब्रुवारी रोजी अर्थात ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला लग्नाची गाठ बांधून प्रेमाच्या नात्याला आठवणीचे कोंदण लावण्याचे मनसुबे आखले जातात. या दिवशी लग्नमुहूर्त नसल्यास अनेक जोडपी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करून तो दिवस अविस्मरणीय करतात. परंतु यंदा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला रविवारची सुट्टी असल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे.

एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून फेब्रुवारी महिन्याकडे पाहिले जाते. फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारीख हा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात विवाह करण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असतो. त्यातही ‘व्हॅलेंटाइन्स’ दिनी विवाह बंधनात अडकून तो क्षण अविस्मरणीय करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्यासाठी काही जण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन साध्या पद्धतीने लग्न करतात. तर काही जण सभागृहात थाटामाटात लग्न करतात. परंतु यंदा व्हॅलेंटाइनच्या दिवशी रविवार आल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे जी जोडपी साध्या पद्धतीने विवाह करण्यास इच्छुक होती त्यांच्यासाठी हा मुहूर्त टळला आहे.

विवाह नोंदणीत घट

गेल्या वर्षी म्हणजेच ७ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील एकूण १५९ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली होती. तर यंदाच्या वर्षी व्हॅलेंटाइन आठवड्याची सुरुवातही रविवार आणि शेवटही रविवारने होत असल्याने या वर्षी या आठवड्यात नोंदणी पद्धतीने होत असलेल्या विवाहांत घट झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षी  ८ फेब्रुवारीला २४ जोडपी, ९ फेब्रुवारीला १२ जोडपी आणि १० फेब्रुवारीला २० जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. तर ११ फेब्रुवारीला २५ जोडप्यांनी आणि १२ फेब्रुवारीला १८ जोडप्यांनी विवाह करण्यासाठी नोंदणी केली असल्याचे विवाह नोंदणी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या व्हॅलेंटाइन आठवड्यात नोंदणी विवाहात घट झाली असून यंदा केवळ ९९ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Registered valentine day wedding is impossible this year akp

ताज्या बातम्या