शहरातील म्हाडाच्या सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हा़डाने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील सावरकरनगर, यशोधननगर, महात्मा फुले नगर, पवारनगर, वसंत विहार, वर्तकनगर, शिवाईनगर आणि स्वामी विवेकानंदनगरमधील तीनशेहून अधिक सोसायट्यांना दिलासा मिळाला आहे. व्याज आणि दंडाची रक्कम सुमारे ३५ कोटींच्या आसपास होती. ही रक्कम माफ झाल्याने नागरिकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात कमी, मध्यम आणि उच्च अशा तीन गटांसाठी घरांची उभारणी केली जाते. अशाचप्रकारे ठाणे शहरात म्हाडाने कमी आणि मध्यम गटासाठी बैठ्या घरांची उभारणी केली आहे. या सोसायट्यांमधील नागरिकांना भाडेपट्टी करार आणि अकृषिक कराची आकारणी करण्याच येते. परंतु नागरिकांनी या कराचा गेले अनेक वर्षे भारणा केला नसल्यामुळे म्हाडाने त्यावर व्याज आणि दंडाची आकारणी केली आहे. हि रक्कम जास्त असल्यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. ठाण्यातील सावरकरनगर भागामध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या असून त्यांनी ही बाब निर्दशनास आणून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी नागरिकांसोबत गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. या संदर्भात सरैय्या यांनी आर. जे. ठाकूर विद्यालयामध्ये २२ जानेवारी रोजी एक बैठक घेतली होती. दरम्यान, मंत्री आव्हाड यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात महत्वाचे आदेश दिले होते. त्यानुसार म्हाडाने सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ सावरकरनगर भागापुरता लागू नसून तो शहरातील इतर भागातील म्हाडा सोसायट्यांना लागू होणार आहे. त्यामध्ये शहरातील सावरकरनगर, यशोधननगर, महात्मा फुले नगर, पवारनगर, वसंत विहार, वर्तकनगर, शिवाईनगर आणि स्वामी विवेकानंदनगरमधील तीनशेहून अधिक सोसायट्यांचा समावेश असल्याचे सरैय्या यांनी सांगितले.

म्हाडाच्या सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील व्याज माफ कऱण्यात येणार असून त्यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय म्हा़ड़ाने घेतला आहे. यासंबंधीचे पत्र म्हा़डाने सरैय्या यांना दिले आहे.