वसईतील ख्रिस्तायण : सात संस्कार | Loksatta

वसईतील ख्रिस्तायण : सात संस्कार

ख्रिस्ती माणसाला जवळ-जवळ सर्व संस्कारांचा स्वीकार करणे आवश्यक असते.’’

वसईतील ख्रिस्तायण : सात संस्कार
ख्रिस्ती समाजात चर्चकडून धार्मिक संस्कार केले जातात.  या संस्कारांना ‘साक्रमेंत’ असे संबोधले जाते.

संस्कार ही मूल्यवर्धित प्रक्रिया आहे आणि याचा व्युत्पत्ती अर्थ चांगले रूप देणे असा होतो. ख्रिस्ती समाजात चर्चकडून धार्मिक संस्कार केले जातात.  या संस्कारांना ‘साक्रमेंत’ असे संबोधले जाते. साक्रमेंत म्हणजे दैवी जीवन आपल्यात घेणे. ख्रिस्त जीवनात सहभागी होणे. म्हणजेच, चांगल्या कृती अंगी बाणवणे, निर्मळ विचार करणे. ‘बाप्तिस्मा’, ‘दृढीकरण’, ‘कम्युनियन’, ‘पश्चताप’, ‘अत्याभंग’, ‘गुरुदीक्षा’, ‘विवाह’ हे सात साक्रमेंत किंवा संस्कार चर्चकडून दिले जातात. हे वयाच्या विविध टप्प्यांवर दिले जाणारे संस्कार आहेत. फादर फ्रन्सिस कोरिया असे सांगतात की, ‘‘या संस्कारांद्वारे मानवाचे जीवन अधिकाधिक प्रगल्भ होते. ख्रिस्ती माणसाला जवळ-जवळ सर्व संस्कारांचा स्वीकार करणे आवश्यक असते.’’

ख्रिस्ती कोणाला म्हणतात? जी व्यक्ती येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेते ती व्यक्ती ख्रिश्चन होय. बाप्तिस्मा हा चर्चकडून दिला जाणारा पहिला संस्कार. हा संस्कार नवजात शिशूला फादरांकडून दिला जातो, तसेच धर्मांतर करण्यासाठीही हा संस्कार चर्चकडून दिला जातो. बाप्तिस्मा संस्कार घेतल्यावर ती व्यक्ती अधिकृतरीत्या ख्रिस्ती समाजात येते. विशिष्ट आकाराच्या नक्षीदार भांडय़ातून पाणी बालकाच्या डोक्यावर सोडले जाते, मग बालकाचा नामकरण विधी संपंन्न होतो. बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्या व्यक्तीला चर्चमध्ये बसणे, प्रार्थना करणे, चर्चमध्ये अंत्यसंस्कार मिळणे इत्यादी गोष्टींची मुभा मिळते.

पूर्वी बाप्तिस्मा देण्यापूर्वी ख्रिस्ती धर्माची माहिती देण्यासाठी वसई किल्लय़ामध्ये शाळा चालत असे. ज्यांना ख्रिस्ती व्हायचे आहे, त्यांना ख्रिस्ती धर्माची शिकववण दिली जात असे. आजही तो वर्ग आपल्याला किल्लय़ात पाहायला मिळतो.

लहान असताना अजाणतेपणे घेतलेला संस्कार अधिक दृढ करण्यासाठी दृढीकरण हा संस्कार दिला जातो. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर त्याला हा संस्कार चर्चमध्ये बिशपांकडून देण्यात येतो. आशीर्वादीत तेल बिशप तरुण किंवा तरुणीच्या कपाळाला लावतात. त्यावेळी ते तरुण किंवा तरुणी ‘मी श्रद्धेमध्ये दृढ झालो किंवा झाले’ असे म्हणतात, तसेच ते तरुण उमेदीत आमेन (हो) म्हणत त्या संस्कारास संमत्ती दर्शवतात.

या पहिल्या आणि दुसऱ्या संस्कारादरम्यान येशूचे शरीर स्वीकारले जाते. म्हणजेच, चांगले गुण आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या संस्कारास कम्युनियन (कॉम-युनियन) किंवा ख्रिस्तशरीर संस्कार  असे म्हटले जाते. ख्रिस्ती जीवन स्वत:मध्ये अधिक समृद्ध करण्यासाठी हा संस्कार घेण्यात येतो. हा संस्कार बालक ८ वर्षांंचे झाल्यानंतर घेतला जातो. चर्चमध्ये मिसा विधी दरम्यान फादर भाकरीचा तुकडा (गोल आकारातील, गोड पातळ पदार्थ) भरवतात. हा संस्कार ख्रिस्ती लोक वारंवार अगदी रोजही घेऊ शकतात.

माणूस हा चुका करत असतो आणि त्यातून तो शिकत पुढे जात असतो. चूक किंवा पाप केल्यावर प्रायश्चित घेतले जाते आणि हाच आहे पुढचा संस्कार कन्फेशन किंवा प्रायश्चित्त संस्कार. व्यक्ती धर्मगुरूंकडे जाऊन आपण केलेल्या चुकीची कबुली देतात. याने मन पवित्र होते आणि पुन्हा देवाचे शरीर स्वीकारले जाते म्हणजेच चांगल्या गोष्टी मनात रुजवल्या जातात.   अत्याभंग किंवा तैलाभ्यांग संस्कार हा पुढील संस्कार आहे. यामध्ये, व्यक्तीला अतिशय गंभीर आजार झाल्यास, व्यक्ती मृत्यू शय्येवर असल्यास पापक्षमा, मनोधैर्य आणि आरोग्य प्राप्त होण्यासाठी देण्यात येतो. हा संस्कार मृत्यूपूर्वी स्वीकारला जातो, तसेच अचानक मृत्यू ओढवल्यास वैद्यकिय मृत्यू होईपर्यंत (म्हणजेच, मृत्यू आल्यानंतर संपूर्ण शरीराची प्रक्रिया थांबेपर्यंतचा काळ) यावेळी त्या व्यक्तीला या संस्काराप्रमाणे पवित्र तेल शरीराला लावले जाते.

सेवाभावी समर्पित जीवन जगण्यासाठी गुरूदीक्षा किंवा ऑर्डिनेशन हा संस्कार स्वीकारला जातो. ज्यांना धर्मगुरू व्हायचे असते ते लोक हा संस्कार स्वीकारतात. ती व्यक्ती समाजापासून अलिप्त होते, या व्यक्तीस विवाह करता येत नाही. आपले महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण करून धर्मगुरू होण्यासाठीचे शिक्षण पूर्ण करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण होण्यास १० वर्षांंचा असतो. वयाच्या २४ व्या किंवा त्यानंतर ते फादर म्हणून कार्यरत होतात. त्यानंतर ते लोकसेवेला स्वत:चे जीवन वाहतात.

शेवटचा, विवाह संस्कार होय. ज्या लोकांना लग्न करायचे असते ते चर्चमध्ये येतात. लग्न करण्याठी तीन लोक लागतात, असे या समाजात मानले जाते. वधू, वर आणि देव या तिघांचा जेंव्हा संगम होतो, तेंव्हा विवाह होतो. ऐहिक जीवनाला आणि सुखाला परमार्थिक अर्थ देण्यासाठी विवाह हा संस्कार स्वीकारला जातो.

या संस्कारांद्वारे ख्रिस्ती जीवन जगता येते. ख्रिस्ती समाजाचा भाग होता येतो. हे संस्कार ख्रिस्ती समाजाच्या आयुष्य समृद्ध करणाऱ्या कृपावाहिन्या समजल्या जातात.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2017 at 01:17 IST
Next Story
शहरबात : पश्चिम पट्टय़ावर जलसंकट