बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून बदलापूर पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या बेलवली परिसरातील भुयारी मार्गाची दुरवस्था झाली होती. याबाबत स्थानिक पालिका प्रशासन, रेल्वे, लोकप्रतिनिधींना वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही भुयारी मार्गाची डागडुजी करण्यात आली नाही. अखेर बदलापुरातील बेलवली ग्रामस्थांनी रविवारी एकत्र येत स्वखर्चाने आणि श्रमदानातून या भुयारी मार्गाची डागडुजी केली आहे. तसेच यावेळी पालिका, रेल्वे आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेबद्दल संतापही व्यक्त केला आहे.
बदलापूर शहरात पूर्व आणि पश्चिम ये-जा करण्यासाठी एकच उड्डाणपूल आहे. तर बेलवली भागात रेल्वेरुळाखालील भुयारी मार्ग आहे. बेलवली, मांजर्ली किंवा चिखलोली भागातून बदलापूर पूर्व भागात जायचे असल्यास किंवा कात्रप भागातून बदलापूर पश्चिमेत यायचे असल्यास बेलवली भागातील भुयारी मार्ग फायद्याचा ठरतो. अन्यथा मोठा फेरा मारून जावे लागते. मात्र अभियांत्रिकी चुकांमुळे उभारणीपासूनच शेजारच्या नाल्याचे पाणी भुयारी मार्गात साचते. परिणामी, पावसाळय़ात चार महिने हाताच्या बोटावर मोजण्याइतका हा मार्ग सुरू असतो. तर इतर दिवसांतही यात पाणी असते. पाण्यामुळे भुयारी मार्गात गाळ, कचरा जमा होतो. त्यामुळे भुयारी मार्गातील पेव्हरब्लॉक
निखळतात. परिणामी, येथून वाहने नेणे धोक्याचे ठरते. गेल्या काही दिवसांपासून या भुयारी मार्गात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला होता. तर पेव्हरब्लॉक निखळल्याने
अनेक लहान-मोठे अपघात होत होते. याबाबत स्थानिक बेलवली ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाला या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र अनेक दिवस त्यावर पालिकेकडून काहीही हालचाल झाली नाही, अशी माहिती बेलवली ग्रामस्थ मंडळाने दिली. त्यामुळे अखेर कंटाळून आम्ही भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चाने आणि श्रमदानातून करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किशोर पाटील यांनी दिली आहे. रविवारी सकाळपासूनच बेलवली ग्रामस्थ भुयारी मार्गात जमले होते. मार्गाच्या दोन्ही बाजूच्या नालीत साचलेला गाळ यावेळी काढण्यात आला. तर निखळलेल्या पेव्हरब्लॉकच्या ठिकाणी नवे पेव्हरब्लॉक बसवण्यात आले, अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा बेलवली ग्रामस्थांची वसाहत पश्चिम भागात आहे.याबाबत स्थानिकांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही भेट घेतली होती. मात्र आश्वासनापलीकडे काहीही हाती लागले नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ मंडळाने दिली आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वेने येथील पायवाट भिंती उभारून बंद केले आहेत. त्याचवेळी पादचारी पुलाची उभारणी करणे गरजेचे होते. मात्र पादचारी पूल उभारण्यात आला नाही. परिणामी, ग्रामस्थांना भुयारी मार्गातून साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. अंत्ययात्राही पाण्यातून न्याव्या लागतात.