कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून टिटवाळा येथील पालिका परिवहन विभागाची (केटीएमटी) सर्वसमावेशक आरक्षणा खालील बांधिव जागा मागील दोन वर्षापासून पालिका परिवहन विभागाकडे हस्तांतरित करण्यात टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे मोक्याच्या जागेवरील बस स्थानक दोन वर्षापासून अडगळीत पडले आहे. तळ आणि एक मजला असलेल्या या जागेत आता गर्दुल्ले, भिकारी यांनी कब्जा केला असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कल्याणमध्ये रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्याची हवालदाराकडून हत्या

टिटवाळा येथील एका भूखंडावर कल्याण डोंबिवली पालिका परिवहन विभागाचे (केडीएमटी) बस स्थानकाचे आरक्षण होते. या भूखंडावर विकासकाने बांधकाम केल्यानंतर नियमानुसार पालिकेला बस स्थानक, कार्यालयासाठी एक मजली बांधकाम विकासकाने ज्येष्ठ वास्तुविशारद राजीव तायशेट्ये यांच्या आराखड्याप्रमाणे करुन दिले. दोन वर्षापूर्वी ही बांधकामे बांधून पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था

या इमारत बांधकामाचे ज्येष्ठ वास्तुविशारद राजीव तायशेट्ये यांनी पालिकेच्या पाठीमागे लागून टिटवाळा येथील केडीएमटी बस स्थानकाची जागा पहिले ताब्यात घ्या, अन्यथा तेथे गर्दुल्ले, भिकाऱ्यांचे अड्डे तयार होतील, असे प्रशासनाला सूचित केले. वास्तुविशारद तायशेट्ये यांच्या तगाद्यामुळे दोन वर्षापूर्वी मालमत्ता विभागाने केडीएमटी बस स्थानकाची समावेशक आरक्षणाची जागा ताब्यात घेतली. ही जागा ताब्यात आल्यानंतर टिटवाळा परिसरात बस फेऱ्यांचे नियोजन या कार्यालयातून करायचे. मोक्याची जागा परिवहन प्रशासनाच्या ताब्यात आल्याने या माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी काय करता येईल यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी नियोजन केले होते. प्रत्येक फेरीसाठी कल्याणला न येता टिटवाळा येथेच काही बस ठेऊन तेथूनच बसचे परिचलन करण्याचा आराखडा परिवहन अधिकाऱ्यांनी केला होता.

बस स्थानकाची तळ, एक मजल्याची बांधीव जागा ताब्यात द्यावी म्हणून परिवहन समिती, परिवहन महाव्यवस्थापक यांनी अनेक पत्रे मालमत्ता विभागाला दिली. दोन वर्षाच्या कालावधीत मालमत्ता विभागाने त्याची दखल घेतली नाही, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्कालीन आयुक्तांच्या याविषयी भेटी घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी ही मालमत्ता ताब्यात देण्याचे तत्कालीन आयुक्तांनी सूचित केले होते. तरीही मालमत्ता विभाग बस स्थानकाची जागा परिवहन विभागाकडे हस्तांतरित का करत नाही याविषयी परिवहन अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>>पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

“ यासंबंधी आपणास सविस्तर माहिती नाही. पण, टिटवाळा बस स्थानक प्रकरणाची माहिती घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करते.”-वंदना गुळवे,उपायुक्त,मालमत्ता विभाग.

“ मागील दीड वर्षापासून टिटवाळा येथील बस स्थानकाची बांधिव जागा ताब्यात द्या म्हणून मालमत्ता विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. जागेचा ताबा मिळत नसल्याने तेथे काही करता येत नाही.”-डाॅ. दीपक सावंत,महाव्यवस्थापक,केडीएमटी.

“पालिकेच्या पाठीमागे तगादा लावून टिटवाळा बस स्थानकाची बांधिव जागा पालिकेकडे हस्तांतरित केली आहे. त्या जागेत बस स्थानक, पहिल्या माळ्यावर कार्यालयासाठी जागा, विश्रांती खोली, स्वच्छता गृह असे नियोजन आहे. ही जागा आता गर्दुल्ले, भिकाऱ्यांच्या ताब्यात गेली आहे. याचे वाईट वाटते. प्रशासन ही जागा केडीएमटीला देण्यात टाळाटाळ करते याचे आश्चर्य वाटते.”– राजीव तायशेट्ये. ज्येष्ठ वास्तुविशारद

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation of kalyan dombivli municipal transport department kdmt bus station on a plot at titwala amy
First published on: 09-02-2023 at 15:50 IST