कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाचा कारभार पूर्ण ढेपाळला आहे. त्याचे भयंकर चटके डोंबिवलीतील रहिवाशांना नागरी समस्यांच्या माध्यमातून बसत आहेत. डोंबिवलीत सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे संथगतीने सुरू आहेत. पदपथावरील झाकणे तुटल्याने अपघाताची शक्यता आहे. डांबरीकरणाचे नवेकोरे रस्ते गॅस कंपन्यांनी वाहिन्या टाकण्यासाठी खोदल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. कचरावाहू वाहनांमधील सांडपाणी रस्त्यावर पडत असल्याने दु्गंधीच्या त्रासाने प्रवासी हैराण आहेत. रस्त्यावर दिवे नसल्याने पादचाऱ्यांना अंधारात घर गाठावे लागते.
या नागरी समस्यांच्या तक्रारी स्थानिक पालिका अधिकाऱ्यांकडे करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या सगळ्या समस्यांचा सर्वाधिक त्रास निवृत्त, ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक होत आहे.




डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात के. बी. वीरा शाळे समोरील रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी खोदण्यात आला आहे. आगरकर रस्त्यावरील ब्राम्हण सभेजवळील गल्लीतील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. फडके रस्ता, टिळक रस्ता यांना जोडणाऱ्या गावच्या गोष्टी दुकान गल्लीतील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ही रस्ते कामे संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. या कामांमुळे परिसरातील रहिवाशांना खोदकाम यंत्रांचा आवाज, धुरळा त्रासाला सामोरे जावे लागते.
टिळकनगरमधील खंडकर गल्लीतील रस्ते काम करताना या भागातील जलवाहिनी जेसीबीने तुटली. काही इमारतींचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. या भागातील मलवाहिन्यांचे चेंबर भरून वाहत आहेत. त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. नेहरू रस्त्यावरील स. वा. जोशी शाळेजवळ नव्याने केलेला डांबरीकरणाचा रस्ता गॅस वाहिन्या टाकण्यासाठी ठेकेदाराने खोदल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील वर्दळीमुळे उडालेल्या धुरळ्याचा शाळा, परिसरातील सोसायट्यांना त्रास होतो. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटका दरम्यान रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. पादचाऱ्यांना अंधारात घर गाठावे लागते.
फडके रस्त्यावर मदन ठाकरे चौकात पदपथावरील फायबरचे झाकण तुटले आहे. रात्रीच्या वेळेत पादचारी या गटारात पडण्याची भीती व्यापारी व्यक्त करतात. हा धोका टाळण्यासाठी एका व्यापाऱ्याने तुटलेल्या झाकणावर गॅस शेगडी ठेवली. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरील दोन्ही बाजुचे पदपथ ठेकेदाराने नगरसेवकाच्या सांगण्यांवरून काढून टाकले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहन चालक वाहने उभे करतात. गल्लीबोळातील रस्त्यावरून चालणे, वाहने नेणे जिकरीचे झाले आहे, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
मानपाडा रस्ता, टिळक रस्ता, घऱडा सर्कल ते माऊली सभागृहा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहन चालक वाहने उभी करतात. खरेदीसाठी बाजारात जातात. अनेक वेळा या महत्वाच्या रस्त्यांवर कोंडी होते. अशा बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या कचरावाहू वाहनांमधील निचऱ्याचे पाणी रस्त्यावर पडत असल्याने दुर्गंधीने प्रवासी हैराण आहेत.
टिळक रस्त्यावरील मोतिलाल नेहरू पथावरील भुयारी वीज वाहक वाहिनी जेसीबीच्या धक्क्याने खराब झाली होती. या वाहिनीजवळ मंगळवारी रात्री दीड वाजता स्फोट झाला. आमिषा, सोनल, रामगोविंद सोसायटी परिसराचा वीज पुरवठा पहाटेपर्यंत बंद होता.
काँक्रीटीकरणाची कामे योग्यरितीने सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण होतील यादृष्टीने ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. – व्ही. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, डोंबिवली
जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटका दरम्यानच्या रस्त्यावरील दिवे चालू आहेत. तांत्रिक अडचणीमुळे ते बंद असतील तर ते तात्काळ सुरू करतो. – भागवत पाटील, उपअभियंता, विद्युत विभाग, डोंबिवली