डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी, मोबाईल चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. विष्णुनगर पोलीस या चोरट्यांच्या मागावर आहेत. बुधवारी रात्री भोजन झाल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका पादचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना एका तरूणाला पादचाऱ्यांनी पकडले. त्याला पकडून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
विष्णुनगर पोलिसांनी या चोरट्यांची कसून चौकशी केली. त्याने स्वताचे नाव अक्षय पांडुरंग धोत्रे (२२) सांगितले. तो बेरोजगार आहे. या चोरट्याने आपण पूर्वी साठेनगर झोपडपट्टी, वागळे इस्टेट ठाणे येथे राहत होतो. आता डोंबिवली पश्चिमेतील सखाराम कॉम्पलेक्समधील सिंघानिया इमारतीच्या खोली क्रमांक १०२ मध्ये राहत आहे अशी माहिती दिली. बेरोजगार असल्याने आपण चोऱ्या करत असल्याची कबुली तरूणाने पोलिसांना दिली. पोलिसांनी अक्षय धोत्रे याची पार्श्वभूमी तपासली. त्याच्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात यापूर्वी मारहाण, चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे आढळले. तो सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर रस्त्यावर संतोषी मंदिराजवळ राहणारे विनाद शर्मा (४९) बुधवारी रात्री भोजन झाल्यानंतर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. चालत असताना अचानक त्याच्या पाठीमागून एक तरूण आला. काही कळण्याच्या आत त्याने विनोद शर्मा यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. सोनसाखळी चोरल्याचे लक्षात येताच विनोद यांनी चोर ओरडत चोरट्याचा पाठलाग केला. पादचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्यावेळी समोरून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक राजेंद्र खिलारे व त्यांच्या गस्ती पथकातील के. जी. घोलप, कुंदन भामरे वाहनातून येत होते. गर्दी पाहून पोलीस वाहन थांबताच, पादचाऱ्यांनी पकडलेल्या तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक मोबाईल, सोनसाखळी आढळून आली. सोनसाखळी विनोद यांची असल्याची कबुली त्याने दिली. मोबाईल कोठुन आणला याची माहिती तो देत नव्हता. पोलिसांनी अक्षयला खाक्या दाखविताच त्याने कोपर रस्त्यावरील संतोषी माता मंदिराजवळील जनार्दन म्हात्रे इमारतीत राहणाऱ्या कैलासकुमार शर्मा (५०) यांच्या घरात दिवसा घुसून मोबाईल चोरला असल्याची कबुली पोलिसांना दिली. सोनसाखळी चोरी बरोबर मोबाईल चोरीचा गुन्हा अक्षयवर पोलिसांनी दाखल केला. एकूण चार गुन्हे दाखल आहेत. मध्यमवर्गिय वस्तीत राहून अक्षय धोत्रे चोऱ्या करत असल्याचे पाहून पोलीस आवाक झाले. उमेशनगर, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा भागात झालेल्या सोनसाखळी चोरीचे प्रकार अक्षयनेच केलेत का. त्याने इतर ठिकाणी असे प्रकार केले आहेत का याचा तपास निरीक्षक खिलारे करत आहेत.