उल्हासनगरात ट्रक टर्मिनलच्या जागी निवासी इमारती?

अवघ्या १३ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगरातील मोठे व्यापारी शहर म्हणून उल्हासनगर शहराला ओळखले जाते.

अग्निशमन कर्मचारी वसाहतीसाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव; व्यापारी शहरात वाहनतळाचा पेच

उल्हासनगर : व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगरात दररोज ये-जा करणाऱ्या लहान-मोठ्या ट्रक, अवजड वाहनांना पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी पालिकेच्या विकास आराखड्यात १२ हजार चौरस मीटरचे क्षेत्र ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित करण्यात आले. मात्र आता पालिका प्रशासनाने आरक्षण बदलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पालिका अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुले उभारण्यासाठीचे आरक्षण निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 

अवघ्या १३ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगरातील मोठे व्यापारी शहर म्हणून उल्हासनगर शहराला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत येथील व्यापाऱ्यांना विविध सुविधा देऊन व्यापार कायम ठेवण्यासाठी सरकारने प्रोत्साहित केले आहे. शहरातील वाहनतळाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव संबंधित विभागाने सादर केला आहे. शहरात असंख्य लहान-मोठे उद्योग असून त्यामुळे दररोज शेकडो अवजड वाहने शहरात ये-जा करत असतात. त्यामुळे शहरात ट्रक टर्मिनल असावे यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले होते. मोठ्या कालावधीनंतर प्रसिद्ध झालेल्या शहराच्या विकास आराखड्यात १२ हजार चौरस मीटरचा भूखंड यासाठी आरक्षित ठेवला गेला. त्यावर ट्रक टर्मिनल उभारले जाईल, अशी आशा असतानाच पालिकेचा नगररचना विभागाने या ट्रक टर्मिनलचे आरक्षण बदलण्याचा घाट घातला आहे.

पालिकेचा प्रस्ताव काय?

शहरातील व्यापारी मालाची ने-आण करण्यासाठी छोटी व्यावसायिक वाहने वापरण्याला पसंती देत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने त्यातून मोठी वाहने नेणे अव्यवहार्य असल्याचे सांगत रहदारीचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शहरात किंवा शहराच्या बाहेर ट्रक टर्मिनलसाठी जागा आरक्षित ठेवणे व्यवहार्य होत नसल्याचे सांगत ट्रक टर्मिनल अनावश्यक असल्याचा दावा पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या टिप्पणीत केला आहे. त्यामुळे ट्रक टर्मिनलचे आरक्षण वगळून ते अग्निशमन केंद्र, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व इतर महापालिका अत्यावश्यक सेवा या शीर्षाखाली आरक्षित ठेवण्यासाठीचा प्रस्ताव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Residential buildings in place of the truck terminal in ulhasnagar akp

ताज्या बातम्या