आधारवाडी कचराभूमी पाहणीत रहिवाशांचा महापौरांना सवाल
कल्याणमधील आधारवाडी कचरा क्षेपणभूमीस वारंवार लागणाऱ्या आगींमुळे हा संपूर्ण परिसर काही दिवसांपासून धुरात घुसमटला आहे. या कचरा क्षेपणभूमीची पाहणी करण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर आणि महापालिका आयुक्त ई. रिवद्रन यांना स्थानिक रहिवाशांनी सोमवारी धारेवर धरले. ‘घरांमधून, गच्चीवरून कचरा भूमीला आग लावली जात असल्याचे नेहमी दिसते. तशा तक्रारीही केल्या आहेत; पण याबाबत पालिका प्रशासन का गप्प आहे, असा थेट सवाल या वेळी काही रहिवाशांनी महापौर, आयुक्तांना केला. यावर आग लावली जात असेल तर निश्चितच चौकशी केली जाईल; परंतु यासंबंधीचे पुरावे आजवर हाती लागलेले नाहीत, असे रिवद्रन यांनी यावेळी रहिवाशांना सांगितले.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीला तब्बल दोन आठवडय़ांपूर्वी लागलेली आग अजूनही काही प्रमाणात धुमसताना दिसत आहे. सातत्याने आग लागत असल्याने अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा येथे तैनात करण्यात आल्या आहेत. या आगीमुळे व त्यातून निघणाऱ्या धुरामुळे या परिसरातील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
याप्रकरणी अनिल ढेरे, अमोल जोशी, योगेश ठाकरे, यादव पाटील, रमाकांत चिखले, प्रा. विनयकुमार भारंबे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन त्यांच्यापुढे म्हणणे मांडले. रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर आणि आयुक्तांनी सोमवारी सकाळी आधारवाडी कचराभूमी परिसराची पाहणी केली.
दरम्यान, कचरा भूमीच्या भेटीसाठी आलेले महापौर आणि आयुक्तांची येथील रहिवाशांनी भेट घेऊन त्यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.
सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे आणि धुरामुळे आम्हाला नातेवाईकांकडे राहायला जावे लागत आहे. मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांना घरी बोलविण्याशिवाय पर्याय नाही. या धुरामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. ही आग लावली जाते हे आम्हाला स्पष्ट दिसते. त्याची कारणे माहीत नाहीत. पण हे महापालिकेस कसे दिसत नाही, असा सवाल यावेळी रहिवाशांनी केला.
कचरा क्षेपणभूमी परिसरातील वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. धुरामुळे घराच्या काचा खिडक्या बंद करून बसावे लागते. वीजपुरवठा खंडित होत असल्याने जीव गुदमरतो. नाकाला रुमाल लावल्याशिवाय घराबाहेर पडणे शक्यच होत नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी मांडल्या. येथे राहाणाऱ्या तरुणांचे लग्न जुळण्यासही या धुरामुळे बाधा येत आहेत, अशा तक्रारीही काही रहिवाशांनी सांगितल्या.मुलीकडील मंडळी दुसरीकडे घर घ्या तरच मुलगी देऊ असे सरळ सांगतात. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर कधीच हे घर विकले असते असे अमोल जोशी या रहिवाशाने सांगितले ते ऐकून महापौर आवाक् झाले.
‘निषेधापेक्षा म्हणणे मांडा’
१७ जून रोजी स्मार्ट सिटी शिखर परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याण येथे येणार आहेत. यावेळी त्यांना निवेदन देऊन काळे झेंडे दाखवून निषेध करा असे शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांनी नागरिकांना सांगितले. त्यावर महापौर देवळेकर यांनी सर्वासमक्षच उगले यांची कानउघाडणी केली. मुख्यमंत्र्यांपुढे म्हणणे मांडण्याऐवजी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात कुठला आला शहाणपणा, अशी विचारणाही महापौरांनी केली.



