कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावातील लोढा हेवन गोकुळधाम सोसायटी येथे दोन तरुणांना सोसायटीतील रहिवाशांनी गरबा खेळण्यास यापू्वी मज्जाव केला. त्याचा राग मनात धरुन तरुणांच्या टोळक्याने सोसायटी आवारात येऊन काही रहिवाशांना शिवीगाळ, मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री बारा वाजता घडला आहे. रहिवाशांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणांच्या विरुध्द तक्रार केली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास

रोशन लोखंडे (रा. हेदुटणे), आकाश सिंग (रा. गोकुळधाम सोसायटी, निळजे), अविनाश कांबळे (रा. चंद्रेश कोणार्क, निळजे), जगदीश अशी आरोपींची नावे आहेत. निळजे गावातील गोकुळधाम सोसायटी आवारात हा प्रकार घडला आहे. गोकुळधाम सोसायटीमधील रहिवासी सचीन कोतकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.

हेही वाचा- ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

पोलिसांनी सांगितले, निळजे येथील भवानी चौकातील गोकुळधाम सोसायटीच्या आवारात दररोज सोसायटीतील महिला, तरुण, तरुणी, बालगोपाल मंडळी गरबा खेळतात. या गरब्याच्या ठिकाणी गोकुळधाम सोसायटीमधील एका कुटुंबात राहत असलेला आकाश सिंग आणि त्याचा हेदुटणे येथील रहिवासी असलेला मित्र रोशन लोखंडे यांना सोसायटी पदाधिकाऱ्यांनी गरबा खेळण्यास मज्जाव केला. आम्ही काहीही केले नसताना आम्हाला मनाई का असे प्रश्न आकाश सिंग यांनी केले. या विषयीचा राग मनात ठेऊन आकाश सिंग याने मित्र रोशन, अविनाश, जगदीश यांच्या मदतीने शनिवारी रात्री बारा वाजता गोकुळधाम सोसायटीच्या आवारात आले. आम्हाला का गरबा खेळू दिला जात नाही असा प्रश्न करुन त्यांनी रहिवाशांना शिवीगाळ सुरू केली. आकाश, रोशन यांनी बांबूने रहिवासी अमन जमादार, तक्रारदार सचीन कोतकर यांना बेदम मारहाण केली.

हेही वाचा- कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार

अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याने सोसायटी पदाधिकारी सचीन कोतकर यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील तपास करत आहेत.